‘त्या’ तीन जागांसाठी महापालिकेला द्यावे लागतील ३० कोटी रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 12:31 IST2019-02-02T12:28:39+5:302019-02-02T12:31:18+5:30
तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘त्या’ तीन जागांसाठी महापालिकेला द्यावे लागतील ३० कोटी रुपये!
- आशिष गावंडे
अकोला: शहराच्या मध्यभागी असलेल्या जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकाच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यासह गांधी जवाहर बगीचालगत असणाºया मैदानावर आॅडिटोरिअम हॉलचे निर्माण केले जाणार आहे. या तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे नियोजन करीत महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थितीत सुधार व्हावा, यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी शहरातील निवडक आरक्षित जागांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव तयार केला. शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा असून, त्यावर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक संकुलांपासून प्रशासनाला महसूल प्राप्त होतो. शहरातील जनता भाजी बाजाराच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स व भाजी बाजाराचे आरक्षण आहे. जुने बसस्थानकाच्या जागेवर सिटी बसस्थानक व व्यावसायिक संकुलाचे आरक्षण आहे. गांधी जवाहर बागेलगतच्या मैदानावर आॅडिटोरिअम हॉलचे आरक्षण आहे. या तीन जागांचा विकास करण्यासाठी महापौर विजय अग्रवाल सरसावल्याचे चित्र आहे.
मनपाचे आर्थिक नियोजन
सदर जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात मनपाला ३० कोटी रुपये जमा करावे लागतील. हा पैसा टप्प्या-टप्प्याने जमा करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला असून, निविदा प्रकाशित करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी कधी मुहूर्त सापडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षांतर्गत गटबाजी; निविदा रखडली!
भाजपातील गटबाजी जगजाहीर असली तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचे चित्र आहे. या तीन जागांवर उभारल्या जाणाऱ्या वास्तूंमुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीतून जिल्हा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर होत असल्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने ३० कोटींचे नियोजन करण्याचे निर्देश मनपाला दिल्याचे बोलल्या जाते.
जुने बसस्थानक
आरक्षण क्रमांक १०३, वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानक
एकूण क्षेत्रफळ- १ लाख ४ हजार ७५ चौरस फूट
जमा होणारी रक्कम- ७ कोटी ३९ लाख ९३ हजार
जनता भाजी बाजार
आरक्षण क्रमांक २०३, वाणिज्य संकुल व भाजी बाजार
एकूण क्षेत्रफळ- २.४७ हेक्टर आर
जमा होणारी रक्कम- १८ कोटी ८० लाख ३५ हजार
आॅडिटोरिअम
आरक्षण क्रमांक १९८, आॅडिटोरिअमची उभारणी
जमा होणारी रक्कम- ३ कोटी ७ लाख २ हजार
* नवीन प्रशासकीय इमारत
नझूल शिट क्रं. ५२, प्लॉट नं. ११/१ जि.प. उर्दू शाळा
एकूण क्षेत्रफळ- २ लाख ७५ हजार २०१ चौरस फूट
शासनाकडून प्राप्त निधी- १० कोटी रुपये
नवीन इमारतीसाठी रक्कम माफीचा प्रस्ताव
जिल्हा परिषदेंतर्गत उर्दू शाळेच्या जागेवर मनपाची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने १० कोटी मंजूर केले. या जागेच्या बदल्यात मनपाला शासनाकडे ५ कोटी ८८ लाख रुपये जमा करण्याची अट असून, महापौर विजय अग्रवाल यांनी ही रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
जनता भाजी बाजार, जुने बसस्थानक व गांधी जवाहर उद्यानलगतच्या जागेसाठी शासनाकडे ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. उपरोक्त तीनही जागांचा विकास झाल्यास मनपाला कायमस्वरूपी उत्पन्न प्राप्त होईल.
- विजय अग्रवाल,
महापौर.