अकोला महापालिका हद्दवाढीला लागणार ‘कात्री’!

By Admin | Updated: April 4, 2016 02:22 IST2016-04-04T02:22:34+5:302016-04-04T02:22:34+5:30

मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा; गोपीकिशन बाजोरिया यांची लक्षवेधी.

Akola Municipal Corporation will be a 'horizontal'! | अकोला महापालिका हद्दवाढीला लागणार ‘कात्री’!

अकोला महापालिका हद्दवाढीला लागणार ‘कात्री’!

अकोला: महानगरपालिकेचे क्षेत्र २५ चौरस किलोमीटरवरून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत विधिमंडळात जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. हद्दवाढीसाठी अनावश्यक भूभागाचा समावेश प्रस्तावित करण्यात आल्याने, हद्दवाढीला 'कात्री' लागण्याची शक्यता आहे.
अकोला महानगरपालिकेची हद्द वाढवून लगतच्या २४ गावांचा समावेश मनपा क्षेत्रात करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, १७ एप्रिलपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत; मात्र त्यापूर्वीच मनपाची ह्यहद्दवाढह्ण विधिमंडळात पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी उपस्थित केली असून, ती मंगळवारी पटलावर येणार आहे. यात त्यांनी मनपाची हद्द २५ चौरस किलोमीटरहून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविली जात असल्याबाबत आक्षेप नोंदवून अनावश्यक भूभाग जोडण्यात येत असल्याने, यातून उपस्थित होणार्‍या अनेक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. वाढते नागरीकरण आणि मनपा हद्दीतील विकासाचा वेग बघता २५ किलोमीटरमध्ये जो विकास साधता आला नाही, तो पुढे १२४ चौरस किलोमीटरच्या हद्दीत कसा साधता येईल, असा प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना दिली. त्यामुळे मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.

'ना इधर के, ना उधर के'!
सध्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून वित्त, आरोग्यासह विविध विकास निधी मिळतो. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेला हा निधी कोट्यवधींच्या घरात आहे. मनपा क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या ग्रामपंचायतींना मिळणारा निधी बंद होईल. याशिवाय या भागापर्यंत विकास पोहोचण्याकरिता किमान २0 वर्षे लागतील. त्यामुळे ग्रामपंचायतींचा हा भाग सर्वच विकासनिधीपासून वंचित राहणार आहे. भरिस भर या परिसरातील नागरिकांना महापालिका कराचा बोजाही सहन करावा लागेल.

शेतीयोग्य जमिनीचा प्रश्न
प्रस्तावित हद्दवाढीनंतर शहराच्या सीमांपासून दूर असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र मनपा हद्दीत येणार आहे. त्यामुळे मनपा क्षेत्र आणि या गावांपर्यंत असलेल्या शेकडो एकर शेतजमिनींचा प्रश्न निर्माण होणार आहे. सिलोडा, चांदूर, खरप, भौरद आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणारी शेकडो एकर जमीन यामुळे नाहक अकृषक होणार आहे.

Web Title: Akola Municipal Corporation will be a 'horizontal'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.