अकोला एमआयडीसीने घेतला २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:28 IST2018-05-12T15:28:05+5:302018-05-12T15:28:05+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

अकोला एमआयडीसीने घेतला २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!
अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.
अकोल्याची पाणी पातळी सातत्याने खालावत असून, दर दोन-तीन वर्षात अकोलेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येतून कायमचे बाहेर पडण्यासाठी एमआयडीसीने वृक्ष लागवड करावी, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी, अभियंता आणि उद्योजकांना पाचारण करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड यांनी २७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट स्वीकारले. यावेळी एमआयडीसीतील अधिकारी-अभियंतादेखील प्रामुख्याने उपस्थित होते.
ओपन स्पेस ताब्यात द्या, ६० हजार वृक्ष लागवडी करू...
एमआयडीसीतील प्रदूषण दूर करण्यासाठी दहा टक्के प्लॉटचे आरक्षण करून त्यावर ग्रीनअरी करण्याचा नियम आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दहा टक्के ओपन स्पेस कुठे आहे. त्याचा वापर काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासनाने ओपन स्पेस ताब्यात द्यावे, ६० हजार वृक्षांची लागवड करून देतो, असे उद्योजकांनी आवाहन दिले आहे. आता एमआयडीसी प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.