अकोला महापौर, उपमहापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत
By Admin | Updated: September 6, 2014 02:16 IST2014-09-06T02:16:00+5:302014-09-06T02:16:00+5:30
भाजपचे आर्थिक गणित शिवसेनेसाठी डोईजड

अकोला महापौर, उपमहापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत
अकोला : शहर विकासाची तळमळ दाखवणार्या विरोधी पक्ष भाजपाने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसमोर ३0 टक्के आर्थिक खर्चाचा प्रस्ताव समोर केला असून, भाजपचे गणित शिवसेनेसाठी डोईजड ठरत आहे. महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करताना एक छदामही न घेणार्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमहापौर पदासाठी का खर्च करावा, असा सवाल शिवसेनेच्या गोटातून उपस्थित केल्या जात आहे.
महापौर पदासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार असल्याचे संकेत आहे. यादरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीला तब्बल दोन कोटी रुपये खर्च येणार असल्याने त्यामधील ३0 टक्के खर्च शिवसेनेने उचलावा, या मुद्यावरून युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महानगर सुधार समितीसह काही अपक्षांनी एकत्र येत, दहा जणांची मोट बांधली आहे. प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यासह उपमहापौर पद देण्याची मागणी या सुज्ञ व प्रामाणिक नगरसेवकांनी भाजपकडे केल्याची माहिती आहे. यासाठी काही ज्येष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. अशास्थितीत उपमहापौरपद शिवसेनेला मिळावे, याकरिता सेनेचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु उपमहापौरपद हवे असल्यास महापौर पदासाठी जो खर्च येईल, त्यामधून ३0 टक्के खर्च शिवसेनेने करावा,असा विचित्र प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याची माहिती आहे. या मुद्यावरून शिवसेनेतील वातावरण तापले आहे.
महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोणतीही आर्थिक मागणी केली नसताना, उपमहापौरपदासाठी ३0 टक्के खर्च का करावा, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. या मुद्यावर भाजपने तोडगा न काढल्यास वेगळा विचार करण्याचे संकेत काही नगरसेवकांनी दिले आहेत.