निवडणुकीनंतर अकोल्याची बाजारपेठ गजबजली
By Admin | Updated: October 22, 2014 00:59 IST2014-10-22T00:59:39+5:302014-10-22T00:59:39+5:30
दिवाळीनिमित्त ग्राहकांच्या पसंतीच्या विविध आकर्षक योजनांची लयलूट

निवडणुकीनंतर अकोल्याची बाजारपेठ गजबजली
अकोला : दिवाळी सण हा शुभ मुहूर्तच. या मुहूर्तावर वस्तूंची खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा असतो. विधानसभा निवडणुकीनंतर दिवाळीसाठी अकोल्याची बाजारपेठ सज्ज झाली असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक योजना विक्रेत्यांनी आणल्या आहेत.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अकोल्याची बाजारपेठ सज्ज झाली आहे. सोन्या-चांदीची दुकाने सजली आहेत, विविध इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवरही विक्रेत्यांनी विविध योजना आणल्या आहेत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे.
मोबाइलचे विविध ब्रँड बाजारात आले आहेत. एक हजार ते ५0 हजार रुपयांपर्यंतचे मोबाइल हँडसेट हजर स्टॉकमध्ये सर्व शोरूममध्ये उपलब्ध आहेत. मोटारसायकल खरेदीकडे ग्राहकांचा विशेष कल दिसून असून, ४५ हजारांपासून तर एक लाख रुपये किमतीपर्यंतच्या विविध कंपन्यांची दुचाकी शोरूममध्ये उपलब्ध आहेत. विविधरंगी मोटारसायकलींचा स्टॉक विक्रेत्यांनी उपलब्ध केला असून, किमान डाउन पेमेंटवर मोटारसायकल खरेदी करता येत असल्याने लोन सुविधेकडे वाहन खरेदी करणार्या ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे.
दहा हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत फ्रिज, तर १२ हजारांपासून चार लाखांपर्यंत एलसीडी, एलईडी व प्लाझमा टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांच्या डीलरनी या वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक योजना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मांडल्या आहेत. पेन ड्राइव्ह, सीडी प्लेअर, मुव्ही पॅक अशा भेटवस्तूंचा यामध्ये समावेश आहे. सहा किलोच्या वॉशिंग मशीनच्या खरेदीवर अन्य वस्तू फ्री ठेवली आहे. आठ ते ५0 हजार रुपयांपर्यंतच्या वॉशिंग मशीन बाजारात उपलब्ध असून, या वस्तू स्क्रॅच कार्डवर देण्याची योजना आहे. या विविध योजना ग्राहकांच्या पसंतीला लक्षात घेऊन सुरु करण्यात आल्या आहेत. दिवाळी निमित्त त्याला प्रतिसाद मिळत आहे.