अकोला मनपाच्या आजच्या सभेत पाणी ‘पेटणार’!
By Admin | Updated: February 16, 2015 02:14 IST2015-02-16T02:14:16+5:302015-02-16T02:14:16+5:30
महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा; पाणीपुरवठय़ाच्या मुद्यावरून वादंग होण्याची चिन्हे.

अकोला मनपाच्या आजच्या सभेत पाणी ‘पेटणार’!
अकोला: महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. सभेत पाणीपुरवठय़ाच्या मुद्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.
शहरात पाणीपुरवठय़ाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्यावतीने बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला महान जलशुद्धीकरण केंद्रावरील २५ एमएलडी प्लांटवरून पाणीपुरवठा केला जातो; परंतु मागील काही वर्षांपासून अधिकृत नळ कनेक्शन न घेता, चक्क मुख्य जलवाहिनीला ह्यटॅपिंगह्ण (पर्यायी अवैध जलवाहिनी) करून पाणी घेण्यात येत आहे. मनपाची थकीत २ कोटी ८५ लाखांची पाणीपट्टी जमा न करता दररोज अवैधरीत्या लाखो लीटर पाण्याचा उपसा व नासाडी सुरू आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने ग्रामपंचायतीला वेळोवेळी अवगतही केले होते; मात्र परिणाम झाला नाही. त्यामुळे मनपाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अवैध नळ जोडण्या तोडल्या होत्या. ग्रामस्थांनी मनपाच्या पथकावर दगडफेकही केली होती. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचा मुद्या ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सोमवारी पाणीपुरवठा योजना व सुजल निर्मल अभियानच्या मुद्यावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत आकस्मिक पाणीपुरवठा योजना, पम्पिंग मशीनच्या खरेदीसाठी दहा टक्के लोकवर्गणी जमा करणे तसेच योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर चर्चा होणार आहे. सभेत शासनाच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत सहभाग घेण्याच्या करारनाम्यावर चर्चा करण्यासह नागरी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रकल्पावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.