अकोला : महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीच्या जागेची मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:45 IST2018-01-13T02:44:58+5:302018-01-13T02:45:09+5:30
अकोला : महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेची जागा निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागेची महापालिका व महसूल विभागाने मोजणी केली. त्यासोबतच जनता भाजी बाजार, जुने बसस्थानकाची जागा, बाजोरिया क्र ीडांगण व डम्पिंग ग्राउंडसाठी भोड येथील जागेचीही मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अकोला : महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीच्या जागेची मोजणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेची जागा निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागेची महापालिका व महसूल विभागाने मोजणी केली. त्यासोबतच जनता भाजी बाजार, जुने बसस्थानकाची जागा, बाजोरिया क्र ीडांगण व डम्पिंग ग्राउंडसाठी भोड येथील जागेचीही मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेच्या जागेवर महापालिकेची प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. यासंदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे सादर करून त्याला मंजुरी मिळवली होती. प्रशासकीय इमारतीसाठी १0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शासनाने निधी मंजूर केल्यानंतर महसूल विभागाच्या अखत्यारित असणारी सदर जागा मनपाकडे हस्तांतरित होणे अद्यापि बाकी आहे. शहराची वाढलेली लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत पडलेली भर पाहता प्रशासनाने अकोलेकरांसाठी पर्यायी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने शहरातील ज्या जागांवर आरक्षण आहे, सदर जागा ताब्यात घेण्यासाठी महापौर विजय अग्रवाल सक्रिय झाले आहेत. यामध्ये टॉवर चौकातील जुने बसस्थानकाच्या जागेवर कर्मशियल कॉम्प्लेक्स आणि वाहनतळाचे आरक्षण आहे. जनता भाजी बाजारच्या जागेवर कर्मशियल कॉम्प्लेक्सचे आरक्षण असून, बाजोरिया क्रीडांगणाच्या जागेवरही शासनाचे आरक्षण आहे. सदर जागांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करून त्याबदल्यात महसूल प्राप्त करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
भोड येथे डम्पिंग ग्राउंड?
नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. कचर्यावर प्रक्रिया होत नसल्याने ग्राउंडवर कचर्याचे ढीग साचले आहेत. यावर पर्याय म्हणून शहरालगतच्या भोड ग्रामपंचायतच्या हद्दीत येणारी जागा प्रस्तावित करण्यात आली.
यासंदर्भात मनपाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असता त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भोड येथील जागेची सुद्धा मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
शहराचा विस्तार वाढला असून, भविष्यातील पंधरा ते वीस वर्षांचे नियोजन ध्यानात घेऊन नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यासाठी आतापासूनच पावले उचलली जात आहेत. उपरोक्त जागांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर केला जाईल. त्यापासून मनपाला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळत राहील.
-विजय अग्रवाल, महापौर