अकोला प्राप्तीकर विभागाचा महसूल सव्वाशे कोटींच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:23 IST2019-01-28T13:23:14+5:302019-01-28T13:23:22+5:30
अकोला: वस्तू आणि सेवा कायद्याची अंमलबजावणी सुरू होताच देशभरातील प्राप्तीकराच्या महसूलमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अकोला प्राप्तीकर विभागाचा महसूल सव्वाशे कोटींच्या वर
- संजय खांडेकर
अकोला: वस्तू आणि सेवा कायद्याची अंमलबजावणी सुरू होताच देशभरातील प्राप्तीकराच्या महसूलमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या महसूल वाढीत अकोला विभागाची भागीदारीदेखील लक्षवेधी ठरत आहे. अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्राप्तीकर विभागाचा महसूल १२५ कोटींच्या वर गेला आहे.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या तेथील व्यापार आणि एकंदरीत आर्थिक उलाढाल लक्षात घेता अकोला विभागाचा महसूल अजूनही प्राप्तीकर विभागाला अपेक्षित तेवढा झालेला नाही. मागील वर्षी आर्थिक उलाढालीचा लेखा-जोखा सादर (रिटर्न फाइल) सादर करणाºयांची संख्या १ लाख ५० हजारांच्या घरात होती. ती संख्या जीएसटीच्या नोंदीमुळे वाढली आहे. जानेवारी २०१९ मध्ये नोंदविलेल्या आकडेवारीनुसार अकोला विभागातील रिटर्न फाइल करणाºयांची संख्या १ लाख ७० हजाराच्या घरात गेली आहे. वार्षिक उद्दिष्टांचा दहा टक्के वाढीचा आकडा केव्हाच पार झाला आहे. मागील वर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटी अकोला प्राप्तीकर विभागाने ११८ कोटींचा महसूल गोळा केला होता. यंदा जानेवारीतच ही आकडेवारी १२५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. आर्थिक वर्षाअखेरीस ही वाढ आणखी काही पटीने वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. प्राप्तीकर विभागाला दरवर्षी दहा टक्के महसूल वाढीचे उद्दिष्ट दिले जाते. कर भरणा करणाºयांची संख्या वाढविण्यासाठी हे उद्दिष्ट महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असते. दरवर्षी दिल्या जाणाºया या करवाढीच्या उद्दिष्टांमुळे महसूल कराचा आकडा दिवसेंदिवस फुगत जात आहे. कर भरणासाठी समाजात जनजागृती करावी म्हणून प्राप्तीकर विभागाच्या वतीने विविध प्रयोग सुरू केले आहे. सीए, विधिज्ञ आणि कर सल्लागारांच्या बैठका, मोहीम, कार्यशाळा, कारवाया आदी प्रयोग सातत्याने सुरू आहे.
पॅन कार्ड लिंकचा परिणाम
बँके तील आर्थिक व्यवहाराशी पॅनकार्ड लिंक केल्याने अनेकांची व्यक्तिगत गोपनीयता भंग झाली आहे. दरम्यान, जीएसटीत समोर आलेल्या करभरणा प्रक्रियेतून अनेक नवीन करदाते प्राप्तीकर विभागाला मिळाले आहे. आता प्राप्तीकर विभागाने कारवाईची मोहीमही तीव्र करण्याचा निर्धार केल्याने लवकरच अनेक करबुडव्यांना नोटीस मिळण्याचे संकेत आहे.