मार्गदर्शक फलकांअभावी जीएमसीत रुग्णांची फरपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:20 IST2020-01-06T14:19:53+5:302020-01-06T14:20:11+5:30
येथे येणाऱ्या बहुतांश रुग्णांसाठी येथील व्यवस्था नवी असल्याने उपचारासाठी वॉर्डाचा शोध घेताना त्यांची चांगलीच पंचाईत होते.

मार्गदर्शक फलकांअभावी जीएमसीत रुग्णांची फरपट!
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात प्रयोगशाळेसह इतर वॉर्डाची माहिती देणारी मार्गदर्शक फलके नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी फरपट होत आहे. येथे येणाऱ्या बहुतांश रुग्णांसाठी येथील व्यवस्था नवी असल्याने उपचारासाठी वॉर्डाचा शोध घेताना त्यांची चांगलीच पंचाईत होते.
अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात. बाह्य रुग्ण विभाग अन् अपघात कक्ष सोडल्यास इतर प्रमुख वार्ड अन् प्रयोगशाळांसाठी कुठलेच मार्गदर्शक फलके सर्वोपचार रुग्णालय परिसरात लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर पुढील तपासण्यांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सर्वोपचार रुग्णालय परिसरात भटकंती करावी लागते. अनेकांना येथील व्यवस्थेबाबत माहिती नसल्याने त्यांची पंचाईत होते. अनेकदा रुग्ण व त्यांचे नातेवाईक या त्रासाला कंटाळून मध्येच उपचार सोडून देतात. याचाच फायदा दलालांकडून घेतला जात असल्याच्या अनेक तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे आल्या आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयांच्या दर्शनी भागात मार्गदर्शक फलके लावण्याची गरज आहे. असे झाल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
हे ठिकाण रुग्णांना शोधणे कठीण
- जन्म-मृत्यू नोंदणी विभाग
- प्रयोग शाळा
- बालरोग वॉर्ड
- सर्जरी वॉर्ड
- क्षयरोग वॉर्ड
- सोनोग्राफी, एक्स-रे वॉर्ड
- महिला वॉर्ड
- शासकीय रक्तपेढी
- जीवनदायी योजना कार्यालय
दलाल घेताहेत फायदा
प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर वॉर्ड किंवा प्रयोगशाळेत पाठविल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी पंचाईत होते. बहुतांश ठिकाणी मार्गदर्शक फलके नसल्याने रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची भटकंती होते. हीच बाब हेरून परिसरात सक्रिय दलाल मात्र, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना घेरतात अन् त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.