अकोला : परप्रांतीय रेड्डीभैयाच्या अंत्यसंस्कारासाठी एकवटली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 13:33 IST2017-12-11T13:30:35+5:302017-12-11T13:33:40+5:30
अकोला : अकस्मात मृत्यू झालेल्या परप्रांतीय इसमाच्या अंत्यसंस्कारासाठी मलकापूरच्या पीकेव्ही कॉलनीतील माणुसकी रविवारी एकवटली. कॉलनीतील विविध जाती-धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन परप्रातांतील या युवकावर अंत्यसंस्कार करून, या परिवाराला धीर दिला.

अकोला : परप्रांतीय रेड्डीभैयाच्या अंत्यसंस्कारासाठी एकवटली माणुसकी
अकोला : अकस्मात मृत्यू झालेल्या परप्रांतीय इसमाच्या अंत्यसंस्कारासाठी मलकापूरच्या पीकेव्ही कॉलनीतील माणुसकी रविवारी एकवटली. कॉलनीतील विविध जाती-धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन परप्रातांतील या युवकावर अंत्यसंस्कार करून, या परिवाराला धीर दिला.
हातावर पोट असणारा परप्रांतीय ४५ वर्षीय मजूर राजू रेड्डी गत सहा वर्षांपासून मलकापूरच्या पीकेव्ही कॉलनीत पत्नी, दोन मुले आणि एका मुलीसह भाड्याच्या घरात राहतो. कॉलनीतील अनेकांच्या घरबांधकामात त्याने मजूर म्हणून निष्ठेने काम केले. आजारी पडलेल्या राजूचा रविवारी अकस्मात मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने या माय-लेकारांना काय करावे कळनासे झाले. कुटुंबीयांचा आक्रोश आणि नागरिकांची हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान, अंत्यसंस्काराची सोय नसल्याचे शेजाºयांच्या बोलण्यातून समोर आले. दरम्यान, कॉलनीतील छायाताई नेरकर यांनी पुढाकार घेतला. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी अंत्यसंस्कारासाठी शंभर रुपयांची मदत मागितली. जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माने पुढे आलेल्या छायातार्इंच्या आवाहनास सर्वांनी प्रतिसाद दिला. इंगळे, जायभाये आणि बहादूरकर परिवाराने पाठबळ दिले. प्रसंगाचे औचित्य ओळखून प्रत्येकाने मदत केली. पाहता-पाहता साडेचार -पाच हजार रुपये गोळा झालेत. या रकमेतून वैकुंठरथ, लाकडे, रॉकेल आणि अंत्यसंस्काराचे साहित्य आणून विधिवत मलकापूरच्या मोक्षधामावर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. पितृछत्र हिरावलेल्या रेड्डी परिवाराला आता पुढील आयुष्य जगण्यासाठी माणुसकीचे बळ हवे आहे, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतल्यास या परिवाराला अधिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.