अकोला जिल्ह्याला मिळणार ‘लाल दिवा’?
By Admin | Updated: October 21, 2014 00:22 IST2014-10-21T00:22:11+5:302014-10-21T00:22:11+5:30
गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता.

अकोला जिल्ह्याला मिळणार ‘लाल दिवा’?
अकोला- राज्यातील सत्ता आणि जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदारांचे समीकरण गत दोन्ही निवडणुकांमध्ये जुळून न आल्यामुळे अकोला जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले होते. यावेळी मात्र जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आमदार मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. पाडव्याला राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. या सोहळ्य़ात अकोला जिल्ह्यातील दोन आमदारांपैकी एकाला श पथ घेण्याची संधी मिळू शकते.
विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झालेत. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मतदारांनी कौल दिला. स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भाजपकडून सत्ता स्था पनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भाजपकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालकांकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी प्रस्ताव पाठविल्यास पाडव्याच्या मुहूर्तावर नवे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ शपथ घेऊ शकते. या मंत्रिमंडळात अकोल्यालाही स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आ. गोवर्धन शर्मा आणि आ. प्रकाश भारसाकळे यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
*२00४ नंतर प्रथमच मंत्रिमंडळात अकोला?
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दोन्ही वेळा अकोला जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. २00४ पासून अकोला जिल्हा मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे. डॉ.दशरथ भांडे यांच्यानंतर जिल्हय़ातील कोणत्याही आमदाराला लाल दिव्याची गाडी मिळाली नाही. १९९९ मध्ये निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्याला त्यावेळच्या सरकारमध्ये बाबासाहेब धाबेकर, रामदास बोडखे आणि डॉ. दशरथ भांडे, असे तीन मंत्री मिळाले होते. त्यानंतर मात्र जिल्ह्याची पाटी कोरीच राहिली.
*गडकरी आश्वासन पाळणार का?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आकोट येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकाश भारसाकळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते. आकोट मतदारसंघातील मतदारांनी गडकरींच्या शब्दावर विश्वास ठेवत भारसाकळे यांना निवडून दिले. आता गडकरी त्यांचे आश्वासन पाळतात काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
तर सभापतीपदही अकोल्यात?
नवीन मंत्रिमंडळात अकोल्याला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेत गोवर्धन शर्मा आणि प्रकाश भारसकाळे हे दोन्ही आमदार आहेत. गडकरींनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भारसाकळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास पक्षातील ज्येष्ठ आमदार म्हणून गोवर्धन शर्मा यांचा विधानसभेचे सभापती म्हणून विचार होऊ शकतो. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. शर्मासुद्धा मंत्रिपदापेक्षा सभापतीपदासाठीच जास्त उत्सुक असल्याचे समजते.