अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान
By Admin | Updated: June 21, 2014 01:28 IST2014-06-21T01:03:41+5:302014-06-21T01:28:00+5:30
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान; मतदार यादीत घोळ

अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान
अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान झाले. मात्र नाव नोंदणी केल्यानंतरही अकोला शहरातील चार केंद्रांत मतदार यादीत नावच नसल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील १७ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले आहे. उमेदवारांमध्ये विमाशिचे आमदार वसंतराव खोटरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे, काँग्रेस शिक्षक सेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश तायडे, बहुजन माध्यमिक शिक्षक संघाचे डॉ. संतोष हुशे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे श्रीकृष्ण अवचार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ डायगव्हाणे गटाचे रामदास बारोटे, इन्शाचे सुभाष गवई, शिक्षक भारतीच्या वर्षा निकम, विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे शेखर भोयर, अजमल युसूफ खान, गुलाम अहमद अमानुल्ला खान, जयदीप देशमुख, नरहरी अर्डक, विजय गुल्हाने आणि सर्जेराव देशमुख यांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातील ११ केंद्रांत मतदान पार प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत गुरुजींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोला शहरातील विद्या मंदिर शाळा व सीताबाई कला महाविद्यालय, बाश्रीटाकळी-पंचायत समिती, आकोट - तहसील कार्यालय, बाळापूर - पंचायत समिती, पातूर - तहसील कार्यालय आणि मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, अकोल्यातील विद्या मंदिर येथील मतदान केंद्रातून अनेक शिक्षकांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदान न करताच परत जावे लागले. पुरवणी यादीच मतदान केंद्रात आली नसल्याचा दावा उमेदवारांच्या सर्मथकांनी केला.