अकोला जिल्ह्यात सरासरी १३.३ मि.मी.पाऊस
By Admin | Updated: July 17, 2014 01:44 IST2014-07-17T01:39:34+5:302014-07-17T01:44:16+5:30
पेरण्या सुरू; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा

अकोला जिल्ह्यात सरासरी १३.३ मि.मी.पाऊस
अकोला: गेल्या चोवीस तासात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३.३ मिलीमीटर पाऊस झाला. रिमझीम पावसानंतर बुधवारपासून जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू करण्यात आल्या; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात आहे.
मंगळवार, १५ जुलै रोजी दिवसभर आणि रात्री जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला. गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारुन बसलेला पाऊस सुरु झाल्याने, शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या. जिल्ह्यातील सातही तालुक्यात सरासरी १३.३ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला १0, बाश्रीटाकळी ६,आकोट ३६.२0,तेल्हारा १५, बाळापूर ६, पातूर ५ आणि मूर्तिजापूर तालुक्यात १३ मि.मी. पाऊस झाला. पावसाअभावी जिल्ह्यात खरीप पेरण्या खोळंबल्या.
पेरणीयोग्य सार्वत्रिक दमदार पाऊस अद्याप झाला नाही; मात्र मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाल्याने, बुधवारी जिल्हाभरात खरीप पेरण्यांना शेतकर्यांनी सुरुवात केली. पावसाची प्रतीक्षा करीत थांबवलेल्या पेरण्या शेतकर्यांनी सुरू केल्या असल्या तरी, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात असल्याचे चित्र आहे.
*दुसर्या दिवशीही अकोल्यात १९.७ मि.मी.पाऊस!
मंगळवारी दिवसभर झालेल्या रिमझिम पावसानंतर दुसर्या दिवश्ी बुधवारी सायंकाळी अकोल्यात पाऊस बरसला. सायंकाळी ६ ते रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान, अकोला शहरात १९.७ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आल्याचे अकोल्यातील हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ढगाळ व पावसाचे वातावरण होते.