अकोला जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे ४४००, तर कोविशिल्डचे २२०० डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 10:46 IST2021-05-31T10:44:39+5:302021-05-31T10:46:43+5:30
Corona Vaccination: कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अकोला जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे ४४००, तर कोविशिल्डचे २२०० डोस!
अकोला : मागील काही दिवसांपासून अकोल्यासह विभागात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. अशातच रविवारी विभागासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ४८ हजार १६० डोस प्राप्त झाले. यामध्ये कोव्हॅक्सिनचे ३६,१६०, तर कोविशिल्डचे १२ हजार डोस आहेत. अकोला जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनचे ४४००, तर कोविशिल्डचे २२०० डोस प्राप्त झाले. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे, मात्र लसीचे पर्याप्त डोस उपलब्ध नसल्याने अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याने, अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुधवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शुक्रवारी सायंकाळी विभागातील पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण केले.