अकोला जिल्हा परिषद ६१ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार!
By Admin | Updated: January 6, 2015 01:40 IST2015-01-06T01:40:10+5:302015-01-06T01:40:10+5:30
दोन वर्षांपासून योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत पडली बंद.

अकोला जिल्हा परिषद ६१ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार!
संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यात ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. ही अपूर्ण कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात या कामांचे प्रस्ताव नव्याने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासन निधीतून ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. जिल्ह्यात गत दोन वर्षांत मंजूर २१५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांपैकी १८९ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ७0 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ५८ पाणीपुरवठा योजनांची कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. तर ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होण्यापूर्वीच बंद पडली आहेत. ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजनांची ही कामे निधी उपलब्ध असताना अपूर्ण अवस्थेतच बंद पडली आहेत. त्यामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांकडून काढून जिल्हा परिषदमार्फत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.
ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली; मात्र अपूर्ण स्थितीत बंद पडलेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून काढून घेण्यात येतील. तसेच अपूर्ण अवस्थेत बंद पडलेली ही कामे पूर्ण करण्यासाठी नव्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत प्रस्तावित करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांनी सांगीतले.