अकोला शहर बस वाहतूक सेवा ठप्प; सत्ताधारी सुस्त
By Admin | Updated: November 24, 2014 01:31 IST2014-11-24T01:31:56+5:302014-11-24T01:31:56+5:30
मुंबई व पुणे येथील कंपनीमार्फत सिटी बस सेवा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या वल्गना हवेत.

अकोला शहर बस वाहतूक सेवा ठप्प; सत्ताधारी सुस्त
अकोला : भंगार झालेल्या शहर बसला अपघात झाल्यास आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होईल, हा निर्णय धडकल्याने मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सिटी बस सेवा बंद केली. त्यानंतर मुंबई व पुणे येथील कंपनीमार्फत सिटी बस सेवा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या वल्गना हवेत विरल्या असून, अकोल्यात येण्यास संबंधीत कंपन्यांनी नकार दिल्याची माहिती आहे. शिवाय प्रशासनाने जारी केलेल्या निविदेकडेही पाठ फिरवण्यात आल्याने शहर बस वाहतुकीची समस्या आणखी वाढीस लागली आहे. या मुद्दय़ावर सत्तापक्षाची उदासीन भूमिका लक्षात घेता, अकोलेकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शहर बस वाहतूक सेवेचा करार संपल्यामुळे ३ ऑगस्ट २0१४ पासून शहरातूल बस वाहतूक बंद करण्याचे पत्र बस वाहतूकदार संस्थेच्यावतीने मनपाला देण्यात आले होते. त्यावर हा करार रद्द करून नवीन गाड्यांची खरेदी करा व मनपाचे पैसे बुडवणार्या संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी सुनील मेश्राम, भारिपचे गजानन गवई यांनी १८ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत केली होती. भंगार झालेल्या बसला अपघात झाल्यास आयुक्त, महापौरांविरुद्ध गुन्हे दाखल होतील, ही बाब समोर येताच बस सेवा बंद करण्याचा निर्णय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. करारात नमूद असलेल २३ पैकी अवघ्या ८ शहर बस बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकर, विद्यार्थ्यांंचे हाल होत आहेत. उपाय म्हणून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आठपैकी चार गाड्यांची रंगरंगोटी करून त्या रस्त्यावर आणल्या होत्या. हा प्रयोग अवघ्या आठ दिवसांतच फसला. अर्थातच, बस सेवेपासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची हमी असतानादेखील उपायुक्त चिंचोलीकरांनी सर्व गाड्या मोटार वाहन विभागात जमा केल्या. नवीन बस सेवेसाठी इच्छुकांकडून प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात निविदा सादर करीत प्रस्ताव मागवले होते. निविदेतील क्लिष्ट अर्टी व शर्ती लक्षात घेता, कोणीही निविदा सादर केली नाही. सीटी बस सेवा ठप्प पडल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.