अकोला-बुलडाणा आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात व्यत्यय

By Admin | Updated: September 4, 2015 22:49 IST2015-09-04T22:49:58+5:302015-09-04T22:49:58+5:30

खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा; दमदार पावसाने हजेरी लावल्याने खेळपट्टी ओली.

Akola-Buldana Interlocked Cricket match interrupted | अकोला-बुलडाणा आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात व्यत्यय

अकोला-बुलडाणा आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात व्यत्यय

अकोला: खैरागड चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील अकोला व बुलडाणा जिल्हा संघात होणार्‍या दोन दिवसीय सामन्यातील पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. शुक्रवारी अकोल्यात सकाळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने खेळपट्टी ओली झाल्याने पंचांनी पहिल्या दिवशीचा खेळ होऊ शकणार नाही, असा निर्वाळा दिला. उद्या शनिवार ५ सप्टेंबर रोजी सामन्याचा दुसरा दिवस असून, सामना खेळला जाईल, अशी माहिती व्हीसीए जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली. विदर्भ क्रिकेट संघटने अंतर्गत अकोला विभागामध्ये येणार्‍या पाच जिलतील सामने अकोला व अमरावती येथे खेळण्यात येत आहेत. अकोला क्रिकेट क्लब मैदानात स्पर्धेतील चार सामने घोषित करण्यात आले. यामधील तीन सामने झाले. चौथा सामना ४ व ५ सप्टेंबर रोजी अकोला व बुलडाणा संघात आयोजित करण्यात आला; मात्र शुक्रवारी अकोल्यात जोरदार पाऊस झाल्याने थर्डी यार्ड खराब झाले. पंच अनिल एदलाबादकर व पवन हलवणे यांनी खेळपट्टीची पाहणी करू न, मैदान खेळण्यायोग्य नसल्याचे सांगून, पहिल्या दिवशीचा खेळ होणार नसल्याचे दोन्ही संघांना सांगण्यात आले. तसेच उद्या सामन्याचा दुसर्‍या दिवशीचा खेळ वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असे सांगितले.

*यंदाच्या स्पर्धेला पावसाचा व्यत्यय

         यंदाच्या खैरागड चषक स्पर्धेत पावसाने सुरुवातीपासूनच व्यत्यय आणला. त्यामुळे स्पर्धा घेण्यास विलंब झाला. स्पर्धा ७ ऑगस्टपासूनच सुरू होणार होती; परंतु मुसळधार पावसामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यानंतर १२ व १३ ऑगस्ट रोजी स्पर्धेला प्रारंभ होणार होता. यावेळीदेखील पावसानेच स्पर्धेला स्थगिती दिली. यानंतर खैरागड चषक स्पर्धा सुरू करण्यास आयोजकांना मुहूर्तच सापडेना. अखेर स्पर्धा २३ ऑगस्टपासून सुरू झाली; परंतु शेवटच्या टप्प्यात परत पावसाने व्यत्यय आणला.

*उपांत्यफेरी व अंतिम सामना कधी?

         स्पर्धेतील उपांत्यफेरीतील सामने आणि अंतिम सामना कधी होणार, कोणत्या शहरात कोणत्या तारखेला होणार, याबाबत अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Akola-Buldana Interlocked Cricket match interrupted