अकोट तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे!

By Admin | Updated: May 27, 2017 00:41 IST2017-05-27T00:41:41+5:302017-05-27T00:41:41+5:30

अधिकारी सुट्यांवर: खुर्च्या रिकाम्या; नागरिक ताटकळत

Akhot tehsil is the responsibility of the office! | अकोट तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे!

अकोट तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे!

विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : एकीकडे नागरिकांचे समाधान करण्याकरिता महाराजस्व अभियानाची तयारी तर दुसरीकडे अकोट तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे २६ मे रोजी लोकमतने सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. तहसीलदारांसह नायब तहसीलदार व प्रमुख अधिकारी सुटीवर गेले आहेत, तर आॅफिसमध्ये रिकाम्या खुर्च्या पडलेल्या असून, कर्मचारी गप्पागोष्टी व मोबाइल पाहण्यात गुंग असल्याचा प्रकार दिसून आला आहे. यावेळी मात्र महत्त्वाच्या कामाकरिता आलेले नागरिक हे या कार्यालयातून त्या कार्यालयात भटकताना तर काही जण मुख्य प्रवेशद्वाराजवळ ताटकळत बसलेले आढळून आले. त्यामुळे महसूल विभाग सुट्यांच्या दौऱ्यांवर तर कार्यालय वाऱ्यावर, अशी अवस्था झाली आहे.
अकोला जिल्ह्यात अकोट हा सर्वात मोठा तालुका महसूल दफ्तरी आहे. उपविभागीय कार्यालयालगतच्या तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह विविध विभागांचे नायब तहसीलदार हे सुट्टीवर गेले, तर दुसरीकडे त्यांच्या कार्यालयातील खुर्च्या व महत्त्वाचे दस्तावेज उघड्यावर पडून होते. लाइट, पंखे सर्रास सुरू होते. अनेक ठिकाणी बाहेरील व्यक्तीच महत्त्वाचे दस्तावेज हाताळताना दिसून आले. नायब तहसीलदारांच्या खुर्च्यांवर हंगामी आॅपरेटर बसून तहसीलचा कारभार पाहत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. कोणीही जबाबदार अधिकारी नागरिकांच्या समस्या हाताळण्याकरिता उपस्थित नसल्याने नागरिक ताटकळत असल्याचे दिसून आले.
अकोट तहसीलदार विश्वनाथ घुगे हे ३ जूनपर्यंत सुटीवर गेले आहेत. नायब तहसीलदार खेडकर हे २९ मेपर्यंत तर नायब तहसीलदार मेश्राम हे अनिश्चित काळाकरिता सुटीवर गेले आहेत. पुरवठा निरीक्षण अधिकारी कहाणे हे तर तब्बल तीन महिन्यांपासून अनिश्चित काळाकरिता सुटीवर आहेत. संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार पद हे मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. या योजनेचा नायब तहसीलदार पदाचा अतिरिक्त प्रभार निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेश गुरव यांच्याकडे देण्यात आला आहे तर तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्यासह सहा पदांचा अतिरिक्त कारभार एकट्या नायब तहसीलदारांकडे आहे. तेसुद्धा कार्यालयात हजर नसल्याने तहसील कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले असल्याचे दिसून आले आहे. उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांचा महसूल यंत्रणेवर वचक नसल्याने पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीरप्रकरणी लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.

एसडीओंच्या आदेशानंतरही अधिकारी सुट्यांवर
महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तार समाधान योजना शिबिर २८ मे रोजी ११ वाजता तेल्हारा येथे पार पडणार आहे. या अभियानाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिबिराच्या दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे चोखपणे करावी, कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, तसेच नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमास गैरहजर राहता येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा आदेश ६ मे रोजी उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने महाराजस्व अभियानसारखे महत्त्वाचे शिबिर असताना सुट्ट्या मंजूर केल्या आहेत. त्यामुळे तहसील अंतर्गत आलेल्या तक्रारींचे निवारण व समाधान त्या-त्या विभागांच्या नायब तहसीलदारांकडून होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपच्या शिवारफेरीत अधिकारी दिमतीला
भारतीय जनता पार्टी या पक्षाच्यावतीने कार्यविस्तार योजनेसारखी माहिती पोहोचविण्याकरिता शिवार फेरी आयोजित केली आहे. या शिवार फेरीमध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे कर्मचारी - अधिकारी दिमतीला घेण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय शासन आदेश नसताना कर्मचारी-अधिकारी मात्र राजकीय पक्षाच्या या शिवार फेरीत सहभागी असल्याने कार्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक झळ सहन करावी लागत आहे.

Web Title: Akhot tehsil is the responsibility of the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.