कृषी विभागाने केले ४ लाख ८० हजार हेक्टरचे नियोजन
By Admin | Updated: May 24, 2017 01:18 IST2017-05-24T01:18:08+5:302017-05-24T01:18:08+5:30
खरीप हंगाम आला; शेत मशागतीला वेग!

कृषी विभागाने केले ४ लाख ८० हजार हेक्टरचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी पावसाळा वेळेवर आणि मुबलक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांपुढे अनंत आर्थिक अडचणी असताना त्यांनी शेत मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. कृषी विभागानेही यावर्षी जिल्ह्यासाठी खरिपाचे ४ लाख ८० हजार ६०० हेक्टर पेरणीचे नियोजन केले आहे.
यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी व आवश्यक ती शेतीची कामे करण्यावर भर दिला असून, अनेक ठिकाणी ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्यात उन्हाचा पारा चढताच आहे. या उन्हातही शेतकरी शेतात राबताना दिसत आहे. शेतात ट्रॅक्टरची घरघर दिसत असून, रोटावेटरने शेत सपाट केली जात आहेत. यावर्षी पिकांच्या नियोजनाबाबत शेतकरी दक्षता घेत आहे. यावर्षी तुरीने कंबरडे मोडल्याने शेतकरी तुरीच्या जागी पर्यायी पीक घेता येईल का, या विचारात आहे. यावर्षी कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनचे क्षेत्र पाच टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मूग, उडीद, ज्वारीची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. कापूस व काही ठिकाणी सोयाबीनमध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने तुरीचे आंतरपीक घेत असतात. ते यावर्षीही घेणारच; पण त्यांची याबाबत द्विधा मनस्थिती आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत कोटीचे पीक कर्ज वाटप झाले आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रबोधन केले जाणार आहे. शेतकरी जनजागृती आठवडा कृषी विभाग राबविणार आहे. अकोला जिल्ह्यात मागीलवर्षी सोयाबीन या पिकाचे दर फारच कमी होते. दरवाढीच्या प्रतीक्षेत आजही हे बियाणे शेतकऱ्यांनी घरी राखून ठेवले आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन कृषी विभाग ५ टक्के क्षेत्र कमी होत असल्याचे सांगत असला तरी शेतकरी वेळेवर काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे.