कृषि विद्यापीठाचे ‘मॉडेल’ जलस्त्रोत कोरडेच !
By Admin | Updated: July 28, 2014 01:55 IST2014-07-28T01:30:20+5:302014-07-28T01:55:17+5:30
कृषी विद्यापीठातील सर्वच तलाव कोरडे; ‘मॉडेल’ जलस्त्रोतही नावालाच उरलेत.

कृषि विद्यापीठाचे ‘मॉडेल’ जलस्त्रोत कोरडेच !
अकोला: यंदा पश्चिम विदर्भात पूरक पाऊस नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सर्वच तलाव कोरडे असून, जलस्रोत बळकटीकरणातंर्गत कोट्यवधी रू पये खर्चून तयार करण्यात आलेले ह्यमॉडेलह्ण जलस्त्रोतही नावालाच उरले आहेत.
विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ाचा मोठय़ा प्रमाणात उपसा झाल्यामुळे भूजलाची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. पूर्वी ओलित असलेल्या भागातही कोरडवाहू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषगांने भूजल संपत्तीची उपलब्धता व भविष्यातील नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने अकोला येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर पथदश्री प्रकल्प तयार केला आहे. त्यासाठी १.९५ कि.मी. नाला रुंदीकरण करू न २ ते २.५ मीटर खोलीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ५ पट जास्त, म्हणजे ६0 हजार घनमीटर असल्याचा दावा कृषी विद्यापीठाने केला होता; तथापि, यावर्षी पाऊस पुरेसा नसल्याने हे मॉडेल नावापुरतेच उरले आहे. भूजल साठय़ात ५ पट वाढ झाल्यामुळे परिसरातील सर्व नाले स्थानिक परिस्थितीप्रमाणे रुंद करू न २ ते ३ मीटरपर्यंत खोल केल्यास भूजल विकास होऊ शकेल.
या उपाययोजनांची अंमलबजावणी मोठय़ा प्रमाणात झाल्यास, विदर्भातील भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी त्या फायदेशीर ठरणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
विद्यापीठाच्या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जलस्त्रोत बळकटीकरणातंर्गत पथदर्श प्रकल्प राबविण्यात आला असून, गेल्यावर्षी या प्रकल्पामुळे भूजल साठय़ात पाच पटीने वाढ झाली होती; परंतु यावर्षी पूरक पाऊस नसल्याने परिस्थिती बिकट झाली असल्याचे जल व मृद अभियांत्रिकी विभागाचे डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.