कृषी विद्यापीठ कर्मचार्यांचे आंदोलन; पेरण्या रखडल्या!
By Admin | Updated: July 18, 2014 00:45 IST2014-07-18T00:34:03+5:302014-07-18T00:45:14+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर.

कृषी विद्यापीठ कर्मचार्यांचे आंदोलन; पेरण्या रखडल्या!
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर गेल्याने कृषी विद्यापीठाच्या साडेतीन हजार एकरावरील पेरण्यांचे काम खोळंबले असून, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना संशोधन सोडून चौकीदाराची कामे करावी लागत आहेत.
रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टर चालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २५ जूनपासून संपावर गेले आहेत. या कामबंद आंदोलनामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावरील मशागत व पेरणीची कामे ठप्प पडली आहेत.
विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घाण साचली आहे. पशू संवर्धन विभाग व प्रत्येक विभागातील गोठय़ात गुरांचे शेण साचले आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे अकोला येथील मध्यवर्ती संशोधन विभाग व वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन क्षेत्रावरील जवळपास साडेतीन हजार एकरावरील मशागतीची कामे ठप्प पडली असून, पेरणी रखडली आहे.
ट्रॅक्टर, वाहन चालकांना ५00 रुपये, रोजंदारी मजुरांना नवीन रोजंदारी वेतनाप्रममाणे ३५0 रुपये देण्यात यावेत, वाहनचालकांची भरती करताना ती केवळ कृषी विद्यापीठांतर्गतच करावी, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वेच्छेने काम सोडणार्या कर्मचार्यांना उपदानाची रक्कम लवकर देण्यात यावी आदी मागण्यांसाठी या कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे.
कर्मचारी कामावर परत येत नसल्यामुळे शास्त्रज्ञ अधिकारी धास्तावले आहेत. या अधिकार्यांना दररोज रात्र व दिवसा कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर गस्त घालावी लागत आहे. त्यासाठी या शास्त्रज्ञ, अधिकार्यांच्या पाळ्य़ा ठरविण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्या पूर्ण न केल्यास या खरीप हंगामात कोणतीच कामे करणार नसल्याचा ठाम निर्धार या कर्मचार्यांनी केला आहे.
आंदोलकांचे नेतृत्व कर्मचारीच सामुहीकरीत्या करीत आहेत. मंगळवारपासून या कर्मचार्यांनी आता साखळी उपोषण सुरू केले आहे. कृषी विद्यापीठाचे अधिकारी या कर्मचार्यांना समजावून सांगण्यास कमी पडत असल्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले आहे.