अकोल्यातून पुन्हा दोन मुले झाली बेपत्ता!
By Admin | Updated: November 12, 2014 01:07 IST2014-11-12T01:07:22+5:302014-11-12T01:07:22+5:30
रविवारपासून परतली नाहीत घरी.

अकोल्यातून पुन्हा दोन मुले झाली बेपत्ता!
अकोला : गत काही दिवसांपासून शहरामध्ये मुले बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी डाबकी रोड व शास्त्री नगर परिसरातील दोन मुले बेपत्ता झाली. याप्रकरणी सिव्हील लाइन व डाबकी रोड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
डाबकी रोड भागात राहणारा शिवम अग्रवाल(१५) व शास्त्रीनगरातील अमानखाँ प्लॉटमध्ये राहणारा हर्ष मातडिया (१५) हे दोघे गुजराती समाज मंडळाच्या जी.एच. कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकतात. रविवारच्या मध्यरात्री ३ वाजतापासून दोघेही बेपत्ता असल्याची खळबळजनक बाब समोर आली. दोघांच्याही कुटुंबीयांनी शहरासोबतच बाहेरगावातील नातेवाईक, मित्रमंडळींकडे दोघाही मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघेही कुठेच आढळून आले नाहीत. त्यामुळे दोघांचेही कुटुंब चिंतेत सापडले आहे. मुलांचा शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना विनंती केली. पोलिसांनीही या दोन्ही विद्यार्थ्यांची छायाचित्रे व त्यांची माहिती राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पाठविली असून, या विद्यार्थ्यांविषयी माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील नोएल कॉन्व्हेंटमधील तीन विद्यार्थी असेच बेपत्ता झाले होते. नंतर ते परतले.