कारवायांनंतरही वाळू तस्करी जोरात!
By Admin | Updated: December 17, 2015 02:20 IST2015-12-17T02:20:09+5:302015-12-17T02:20:09+5:30
चोरट्या मार्गाने शहरात येतात वाळूचे ट्रक; महसूल विभागाला लाखोंचा चुना.
_ns.jpg)
कारवायांनंतरही वाळू तस्करी जोरात!
अकोला : जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झालेले नसतानाही सर्वच घाटांवरून वाळूचा अवैधरीत्या वारेमाप उपसा सुरू आहे. महसूल खात्याने जिल्हाभरात वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असला तरी तस्करी जोरात सुरूच आहे. नद्यांच्या पात्रांमधून अवैधरीत्या उपसा करण्यात आलेल्या वाळूची चोरट्या मार्गाने अकोला शहरात आणून अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत असल्याचे ह्यलोकमतह्णने बुधवारी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णद्वारे समोर आले. दरवर्षी पावसाळा संपला की, जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव महसूल विभागमार्फत करण्यात येतो. या लिलावातून मिळणारा महसूल शासनासाठी महत्त्वाचा असतो. यावर्षी डिसेंबर महिना सुरू असला तरी अद्याप वाळूघाटांचा लिलाव झाला नाही. तथापि, जिल्हाभरातील वाळूघाटांवरून अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरूच आहे. कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता नदीपात्रांमधून वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक जिल्हाभर सुरू आहे. बांधकाम साहित्यात वाळू हा अविभाज्य घटक असल्यामुळे शहरात मोठी मागणी आहे. नेमकी हीच बाब हेरून शहरात चोरट्या मार्गाने वाळू आणली जाते आणि अव्वाच्या सव्वा दराने विकली जाते. प्रतिट्रक १0 ते १२ हजार रुपये दराने वाळूची विक्री होत आहे, तर ट्रॅक्टरसाठी हा दर चार ते सहा हजार रुपये एवढा आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्याचवेळी वाळूमाफियांचे उखळ पांढरे होत आहे.