After the obstruction, the Amravati-Mumbai Express finally got easier | अडथळ्यानंतर अखेर अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा मार्ग सुकर

अडथळ्यानंतर अखेर अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा मार्ग सुकर

ठळक मुद्देनियोजित फेऱ्या रद्द केल्याचा आदेश घेतला मागे गाडी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच धावणार असल्याची अधिसूचना मध्य रेल्वेने काढली.

अकोला : पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत सोयीस्कर असलेली अमरावती-मुंबई ही विशेष गाडी येत्या २५ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा केल्याच्या २४ तासांतच या गाडीच्या फेऱ्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्याचे मध्य रेल्वेने गुरुवारी (दि. २१) जाहीर केले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच हा आदेश रद्द करत ही गाडी नियोजित दिवसापासून धावणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीची असल्याने अमरावती-मुंबई एक्स्प्रेस लोकप्रिय ठरली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत अनेक उत्सव गाड्या सुरू करण्यात आल्या. तथापि,अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झेंडी मिळाली नव्हती. मोठ्या जनरेट्यामुळे अखेर मध्य रेल्वेने २५ जानेवारीपासून ०२११२ अमरावती-मुंबई, तर ०२१११ मुंबई-अमरावती या विशेष गाड्या धावणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाने गुरुवारी एक प्रसिद्धीपत्रक काढत या गाडीच्या फेऱ्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येत जाहीर केले. त्यामुळे अकोल्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील प्रवाशांमध्ये निराशा पसरली होती. त्यानंतर अचानक नाट्यमय घडामोड होऊन सायंकाळी ही गाडी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच धावणार असल्याची अधिसूचना मध्य रेल्वेने काढली. त्यामुळे आता ही रेल्वे २५ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला पाठपुरावा

अकोला आणि लगतच्या जिल्ह्यांमधील प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर असलेली ही रेल्वेगाडी पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत ही विशेष गाडी येत्या २५ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. गुरुवारी अचानक ही गाडी रद्द करण्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्यानंतर संजय धोत्रे यांनी रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही गाडी पूर्ववत सुरू करण्यात यश मिळविले.

Web Title: After the obstruction, the Amravati-Mumbai Express finally got easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.