शपथपत्रात गुन्ह्याची माहिती दडवली; हातगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:49+5:302021-07-07T04:23:49+5:30
२०२० मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अक्षय जितेंद्र राऊत यांनी प्रभाग ५ मधून ग्रामपंचायत सदस्याकरिता २४ डिसेंबर २०२० रोजी ...

शपथपत्रात गुन्ह्याची माहिती दडवली; हातगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल
२०२० मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अक्षय जितेंद्र राऊत यांनी प्रभाग ५ मधून ग्रामपंचायत सदस्याकरिता २४ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी उमेदवारी अर्जासोबत त्यांचे शपथपत्रसुद्धा जोडले होते. सदर शपथपत्रात उमेदवाराची गुन्हेगारीसंबंधी माहिती विचारली होती. त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सरपंच अक्षय राऊत यांनी म्हटले आहे. परंतु त्यांच्यावर ३२४, ५०४, ३४ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या संदर्भात सुरेश पुंडलिक जोगळे यांनी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना तशी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी ४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान अक्षय राऊत यांनी शपथपत्रात गुन्हेगारीची माहिती दडवली असल्याचे निष्पन्न झाले. यावरून नायब तहसीलदार (निवडणूक) आर.एम. पांडे यांनी २ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार हातगावचे सरपंच अक्षय राऊत (२५) यांच्या विरुद्ध राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार १७१ जी, १७७, १८१ नुसार गुन्हा दाखल केला.