राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ!
By Admin | Updated: September 10, 2014 01:42 IST2014-09-10T01:42:34+5:302014-09-10T01:42:34+5:30
अकोला बाजार समितीचे मुख्य प्रशासक शिरीष धोत्रे

राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ!
अकोला: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शासनाच्या पणन विभागाने नवे प्रशासक मंडळ नेमले आहे. शेतकर्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३0 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपल्याने पणन विभागाने या समित्यांचा कारभार शासकीय प्रशासकांकडे सोपवला होता. याबाबत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेऊन शासनाच्या निर्णयावर स्थगिती मिळविली होती; तथापि शासनाने बाजार समितीच्या निवडणुका जाहीर न केल्याने आणि दरम्यानच्या काळात स्थगितीची मुदत संपल्याने सहकार पणन विभागाने बाजार समित्यांवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ती केली होती. तीन महिन्यांपासून या समित्यांचे कामकाज शासकीय प्रशासकामार्फतच सुरू होते. दरम्यान, सर्व बाजार समित्यांमध्ये प्रशासकांचा कारभार सुरू असताना, समित्यांमध्ये शेतकर्यांची वर्दळ कमी झाली होती. पदाधिकार्यांकडे तक्रारीचा ओघ वाढला होता. या पृष्ठभूमीवर शासनाच्या सहकार विभागाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रशासक मंडळावर सभापती व स्थानिक कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. त्यानुसार अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी सभापती शिरीष धोत्रे यांच्याकडे मुख्य प्रशासकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्रशासक मंडळात डॉ. सुभाषचंद्र कोरपे, नीळकंठ खेडकर, हेमंत देशमुख, डॉ. अनंतराव भुईभार, जयश्री कळसकर, प्रकाश काळे यांचा समावेश करण्यात आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांसह अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर, पातूर, तसेच बुलडाणा आदी सर्वच बाजार समित्यावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले. बाजार समितीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक निर्णय लवकरच घेतले जाणार आहेत.