अकोला जिल्हय़ातील चार बाजार समित्यांवर प्रशासक !
By Admin | Updated: November 13, 2014 01:20 IST2014-11-13T01:20:36+5:302014-11-13T01:20:36+5:30
अकोला बाजार समितीचे प्रशासक एच.डी. डोंगरे.

अकोला जिल्हय़ातील चार बाजार समित्यांवर प्रशासक !
अकोला : जिल्ह्यातील चार कृषिउत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, समित्यांवर तडकाफडकी प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. अकोला बाजार समितीच्या प्रशासकपदाचा भार एच. डी. डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राज्यातील शंभरावर कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले होते. तत्कालीन शासनाने प्रशासक काढून त्या ठिकाणी मंडळ स्थापन केले होते. या मंडळाच्या अध्यक्षपदी बाजार समित्यांच्या सभापतींची निवड केली होती. नवे सरकार विराजमान होताच विद्यमान सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. ते आदेश मंगळवारी सायंकाळी धडकले. जिल्हा सहाय्यक उपनिबंधकांनी या आदेशाची आज बुधवारी तातडीने अंमलबजावणी केली असून,अकोला,बार्शिटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर या चार बाजार समित्यांवर प्रशासकांची नव्याने नेमणूक केली आहे.
अकोला बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे पातूरचे सहायक तालुका निबंधक ए. डी. डोंगरे यांच्याकडे सोपविली आहेत. मूर्तिजापूर कृषिउत्पन्न बाजार समिवर डी. आर. पिंजरकर, बार्शिटाकळी बाजार समितीच्या प्रशासकपदी ओ. एस. साळुंखे, तर पातूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे आर. आर. विटणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
*आता निवडणुकांची प्रतीक्षा
जिल्ह्यातील या चार बाजार समित्यांच्या निवडणुका होऊन नवे संचालक मंडळ कार्यरत होईपर्यत प्रशासक राहणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम आला आहे. तथापि, सुरुवातीला सेवा सहकारी व सहकारांशी संबंधित इतर बाबींच्या निवडणुका झाल्यावर बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
*अकोट, बाळापूर समित्यांना मुदतवाढ
बाळापूर आणि अकोट कृषिउत्पन्न बाजार समित्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिलेली असल्याने या बाजार समित्यांवर संचालक मंडळ आहे. तेल्हारा कृषिउत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ कार्यरत आहे. या संचालक मंडळाचा कार्यकाळ २0१६ पर्यंत आहे.