सावधान ! बोगस बियाणे, खतं विक्री करणाऱ्यावर प्रशासनाचा ‘वॉच’
By रवी दामोदर | Updated: April 19, 2023 18:04 IST2023-04-19T18:04:06+5:302023-04-19T18:04:49+5:30
पावसाळा सुरू होताच बियाणे व खताचे दर वाढविले जातात. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याची शक्यता अधिक असते.

सावधान ! बोगस बियाणे, खतं विक्री करणाऱ्यावर प्रशासनाचा ‘वॉच’
अकोला : आगामी खरीप हंगाम अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला असून, त्यानुषंगाने कृषी विभागही अलर्ट झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना योग्य दरात चांगल्या दर्जाची बियाणे व खत मिळावे, यासाठी कृषी विभागामार्फत बियाणे व खतांच्या पुरवठा व गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दुसरीकडे, बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांवर आता प्रशासनाचा वॉच राहणार असून, कृषी विभागाने तालुकानिहाय एक याप्रमाणे सात तर जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र भरारी पथक नेमले आहे. त्यामुळे आता बोगस बियाणे, खतांची विक्री करण्याऱ्यांवर कारवाई होणार आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ च्या पूर्व तयारीत बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होताच बियाणे व खताचे दर वाढविले जातात. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारण्याची शक्यता अधिक असते. परिणामी, शेतकऱ्यांची फसवणूक होते व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळते. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी कृषी विभागाने बोगस बियाणे, खत विक्रीवर आळा ठेवण्यासाठी भरारी पथक तयार केले आहेत. पथक बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असून, कृषी केंद्रामध्ये जावून बियाण्यांची तपासणी सुद्धा करणार आहे.
असे आहे जिल्हास्तरीय पथक
जिल्हास्तरीय पथकामध्ये चार अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात पथक प्रमुख म्हणून प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.टी चांदूरकर, सदस्य सचिव म्हणून माेहीम अधिकारी मिलींद जंजाळ आणि सदस्य म्हणून जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लाेखंडे व सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र ढाले यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक
जिल्हास्तरीय पथकाव्यतिरिक्त जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर व अकोट तालुक्यामध्ये प्रत्येक एक-एक पथक गठित करण्यात आले आहे. पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी, असतील तर कृषी अधिकारी पं.स, निरीक्षक वजन मापे, कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचा पथकात समावेश असून, एकूण सात पथके कार्यान्वित केले आहेत.
बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्यावर फौजदारी दाखल करण्यात येईल. शेतकऱ्यांनाही बोगस बियाणे-खतं विक्री करताना आढळून आल्यास त्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.