याद्यांअभावी थांबविले शिक्षकांचे समायोजन
By Admin | Updated: May 11, 2015 02:23 IST2015-05-11T02:23:44+5:302015-05-11T02:23:44+5:30
पातूर, तेल्हारा तालुक्यातील याद्या रखडल्या.

याद्यांअभावी थांबविले शिक्षकांचे समायोजन
अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हय़ातील सातही पंचायत समितीस्तरावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन ६ मे रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र पातूर व तेल्हारा या दोन पंचायत समिती अंतर्गत समायोजनास पात्र शिक्षकांच्या याद्या तयार नसल्याने, याद्यांअभावी जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तूर्त थांबविण्यात आले आहे. जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सातही पंचायत समितीस्तरावर ६ मेपासून सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले होते. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकार्यांमार्फत जिल्हय़ातील पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकार्यांना निर्देशही देण्यात आले होते; परंतु जिल्हय़ातील सात पंचायत समित्यांपैकी पातूर व तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत समायोजनास पात्र शिक्षकांच्या याद्या तयार करण्यात आल्या नसल्याने, ६ मेपासून सुरू करण्यात येणारे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया तूर्त थांबविण्यात आल्याच्या सूचना शिक्षणाधिकार्यांमार्फत जिल्हय़ातील गटशिक्षणाधिकार्यांना देण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर आधीच विलंब झालेल्या जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे.