पाणीटंचाई निवारणार्थ ‘अँक्शन प्लॅन’
By Admin | Updated: December 24, 2015 03:04 IST2015-12-24T03:04:16+5:302015-12-24T03:04:16+5:30
मूर्तिजापूर तालुक्यासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या योजना मंजूर

पाणीटंचाई निवारणार्थ ‘अँक्शन प्लॅन’
दीपक अग्रवाल /मूर्तिजापूर (जि. अकोला) : तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने कृती आराखडा तयार केला आहे. ७२५ उपाययोजनांसाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
यंदा तालुक्यात अनियमित व अल्प पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पामध्ये मुबलक जल साठा नाही. भूजल पातळीही घटली आहे. परिणामी काही गावांमध्ये तर हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संभाव्य आराखडा तयार करण्यात आला. यासाठी तीन टप्पे तयार करण्यात आले. दुसर्या टप्प्यात जानेवारी-१६ ते मार्च-१६ या कालावधीमध्ये विविध उपाय करण्यात येणार आहेत.
तिस-या टप्प्यात पाणी पेटणार!
एप्रिल-१६ ते जून-१६ या कालावधीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे. या कालावधीत ४८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार आहे. यासाठी एकूण ३४१ उपाययोजना प्रस्तावित आहेत. कृती आराखड्यातील तिसर्या टप्प्यामध्ये ७0 विहिरी खोदण्यात येणार असून, गाळ काढण्यात येणार आहे. ३२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. ३३ टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येणार असून, प्रगतिपथावरील ४ नळयोजना पूर्ण करण्यात येणार आहेत. ३६ नळयोजना पूर्ण करणे, नळयोजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या स्वरूपात ४ नळयोजना सुरू करणे, ७९ विंधन विहिरी व हातपंपांची दुरुस्ती करणे, ७८ नवीन हातपंप करणे, अशा स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.