शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई
By Admin | Updated: July 8, 2014 21:45 IST2014-07-08T21:45:59+5:302014-07-08T21:45:59+5:30
ग्रामसभा घेतल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी येथील ग्रामसेवक विरुद्ध वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.

शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई
मुंडगाव : ग्रामसभा घेतल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक व्ही. व्ही. भदे यांच्याविरुद्ध वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मुंडगावचे तत्कालीन ग्रामसेवक व्ही. व्ही. भदे यांनी २६ जानेवारी २0१३ ला सकाळी १0 वाजता एकाच वेळी मुंडगाव व आसेगावबाजार येथे ग्रामसभा घेतल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार उघड झाल्याने त्यांची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न करता रोखण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी दिले.
येथील सामाजिक कार्यकर्ते विजय आखरे यांनी १८ फेब्रुवारी २0१४ रोजी गटविकास अधिकारी आकोट व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला यांच्याकडे सचिव भदे यांची तक्रार केली होती.
उपरोक्त तक्रारीमध्ये ग्रामसेवक व्ही. व्ही. भदे यांनी २६ जानेवारीला मुंडगाव व आसेगावबाजार येथे एकाच वेळी सकाळी १0 वाजता ग्रामसभा घेतल्यचे दर्शवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.
त्यावर या प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी पंचायत समिती आकोट यांनी करून तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला यांना सादर केला. भदे यांनी एकाच दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये सभा घेतल्याचे चौकशीत उघड झाले. या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ च्या तरतुदीनुसार ग्रामसेवक भदे यांची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न करता रोखण्यात आल्याचे आदेश काढले आहेत. (वार्ताहर)