विनाकारण फिरणाऱ्या २२५ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:47+5:302021-04-21T04:18:47+5:30
मास्क न वापरणाऱ्या १७८ जणांना दंड, ४ आस्थापनांवर गुन्हा अकोला : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ...

विनाकारण फिरणाऱ्या २२५ जणांवर कारवाई
मास्क न वापरणाऱ्या १७८ जणांना दंड, ४ आस्थापनांवर गुन्हा
अकोला : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी पहाटेपासूनच पोलिसांनी गस्त वाढविली असून विना मास्क फिरणारे, विनाकारण फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यात ही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत; मात्र तरीही काही नागरिक या निर्बंधांना न जुमानता विनाकारण बाहेर फिरत असल्याचे समोर आले. मॉर्निंग वाॅक, इव्हिनिंग वाॅक यासह केवळ लॉकडाऊन कशाप्रकारे आहे, हे पाहण्यासाठी बाहेर नागरिक निघत आहेत. याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांच्या निर्देशवरून मास्क न वापरणाऱ्या १७८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ४ आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ४३ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशाप्रकारे एकूण २२५ पेक्षा अधिक जणांवर कारवाई करून सुमारे ३९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.