‘डीजे सिस्टम’च्या ११ वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: August 25, 2016 02:02 IST2016-08-25T02:02:28+5:302016-08-25T02:02:28+5:30
गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची तयारी सुरु झाली असून पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली.

‘डीजे सिस्टम’च्या ११ वाहनांवर कारवाई
अकोला, दि. २४: गणेशोत्सवासह धार्मिक सण उत्सवाला सुरुवात होणार असून, यामध्ये अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. याच पृष्ठभुमीवर अकोला पोलिसांनी बुधवारी शहरातील डीजे साउंड सिस्टम असलेल्या ११ वाहनांवर कारवाई केली असून, ही वाहने संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उभी करण्यात आली आहेत. शहर वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी ही कारवाई केली. शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या डीजे साऊंड सिस्टमची दोन वाहनांवर गणेशोत्सवापूर्वी कारवाई करण्यात आली असून, ही वाहने पोलीस स्टेशनमध्ये उभी करण्यात आली आहेत. यासोबतच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्येही डीजे साऊंड सिस्टम असलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. रामदास पेठ पोलीस स्टेशन, जुने शहर पोलीस स्टेशन, डाबकी रोड पोलीस स्टेशन आणि सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये डीजे साउंड सिस्टम असलेली वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी ही कारवाई केली असून, या वाहनांना पोलीस स्टेशनमध्ये उभे ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव आणि धार्मिक सण, उत्सव काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाय-योजना करण्यात येत आहेत. त्याच पृष्ठभुमीवर मंगळवारी १७५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, बुधवारी डीजे सिस्टम असलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.