१५ कोटींच्या रस्त्यांना ग्रहण
By Admin | Updated: October 25, 2014 00:56 IST2014-10-25T00:56:25+5:302014-10-25T00:56:25+5:30
अकोला शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी निविदाच नाहीत!

१५ कोटींच्या रस्त्यांना ग्रहण
अकोला : गतवर्षीच्या पावसाळय़ात दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त १५ कोटींच्या विकास कामांना ग्रहण लागले आहे. प्राप्त अनुदानातून १८ रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. यामधील १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास उर्वरित सहा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी निविदाच सादर करण्यात आली नसल्याची माहिती आहे. गतवर्षी २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. सिव्हील लाईन रोड, रतनलाल प्लॉट चौक, टॉवर चौक, मध्यवर्ती बस स्थानक या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही मोजके सिमेंट काँक्रीटचे रस्ते वगळल्यास संपूर्ण शहरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डय़ांमुळे नीट पायी चालणेदेखील कठीण झाले असून, याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यांची स्थिती लक्षात घेता, तत्कालीन मनपा आयुक्त दीपक चौधरी यांच्या कार्यकाळात शासनाने १५ कोटींचे अनुदान मंजूर करीत तत्काळ वितरित केले. यावर मनपाने नियोजन करून निविदा प्रक्रिया पूर्ण करणे भाग होते. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आजपर्यंंत एक-दोनदा नव्हे तर चक्क पाच वेळा निविदा प्रकाशित केल्या. १८ रस्त्यांपैकी १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास सिमेंट काँक्रीटच्या सहा रस्त्यांसाठी आजपर्यंंत निविदा अर्ज प्राप्त झाले नसल्याची चिंताजनक स्थिती आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लगेच १५ कोटींच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात होईल, असा दावा मनपातील वरिष्ठ अधिकार्यांनी केला होता. रस्त्यांची रखडलेली निविदा प्रक्रिया लक्षात घेता, प्रशासनाचा दावा कितपत खरा ठरतो, याकडे शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने सहा सिमेंट रस्त्यांसाठी निविदा प्रकाशित केली होती. दोन सिमेंट रस्त्यांसाठी निविदा प्राप्त झाली असून, येत्या २७ ऑक्टोबरला दोन्ही निविदा उघडल्या जातील, असे मनपाचे शहर अभियंता अजय गुजर यांनी स्पष्ट केले.