आरोपी शिक्षक कुटुंबियांसह फरार
By Admin | Updated: April 2, 2015 02:10 IST2015-04-02T02:10:59+5:302015-04-02T02:10:59+5:30
नवोदयच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ प्रकरण; दोन्ही शिक्षकांचा शोध सुरू.

आरोपी शिक्षक कुटुंबियांसह फरार
अकोला - बाभूळगाव जहांगिर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता नववी ते बारावीच्या ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्या दोन शिक्षकांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शिक्षक कुटुंबियांसह फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत चालविण्यात येणार्या अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षक आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके हे विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत बोलून त्यांचा विविध प्रकारे छळ करीत होते. विद्यार्थिनींशी ते लगट साधण्याचा प्रयत्न करायचे. विद्यार्थिनींनी या प्रकाराला विरोध केल्यास प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत, विद्यालयातून काढून टाकू, अशा धमक्या त्यांना मिळायच्या. त्यामुळे विद्यार्थिनी गत चार वर्षांपासून हा छळ निमूटपणे सहन करीत होत्या; मात्र एका विद्यार्थिनीने हिम्मत करून या प्रकाराची तक्रार २0 मार्च रोजी विद्यालयाचे प्राचार्य आर. सिंह यांच्याकडे केली. विद्यार्थिनीने तक्रार केल्याची माहिती मिळताच दोन्ही शिक्षकांनी स्थानिक राजकीय पदाधिकार्यांना सोबत घेऊन विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. विद्यार्थिनीने दबावाला बळी पडून तक्रार मागे घेतली. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. मंगळवारी त्या नवोदय विद्यालयात गेल्या असता, ४९ विद्यार्थिनींनी या दोन शिक्षकांनी लैंगिक छळ चालवल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. त्यानंतर पालक-शिक्षकांची सभा घेतली असता, त्यामध्ये विद्यार्थिनींनी या संपूर्ण प्रकरणाची आपबितीच कथन केली. त्यामुळे २३ पालकांसमवेत डॉ. आशा मिरगे यांनी या प्रकरणाची तक्रार मंगळवारी रात्री सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिली. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, उपविभागीय अधिकारी खडसे आणि तहसीलदार संजय शिंदे यांनी विद्यालयाची पाहणी करून दोन्ही शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य आर. सिंह यांनी सिव्हिल लाइन्स ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके यांच्याविरुद्ध कलम ३५४ अ आणि पॉस्को अँक्टच्या कलम ७, ८ (लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनीयम २0१२) नुसार गुन्हा दाखल केला.
*आरोपी शिक्षक कुटुंबीयांसह फरार
आर. बी. गजभिये आणि शैलेश रामटेके हे दोन्ही आरोपी शिक्षक त्यांच्या कुटुंबीयांसह मंगळवारी सकाळीच फरार झाले. या प्रकरणाचा त्यांच्यासमोरच खुलासा व्हावा म्हणून, पालक-शिक्षक सभेत उपस्थित राहण्यासाठी त्यांना सांगण्यात आले होते; मात्र पालक येण्यापूर्वीच दोघेही पसार झाले.
*जिल्हाधिका-यांकडून चौकशी
सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी अरुण शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार संजय शिंदे यांनी बुधवारी दुपारी प्रत्यक्ष विद्यालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर प्राचार्य आर. सिंह यांना तातडीने फौजदारी कारवाईसाठी तक्रार देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर सिंह यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
*दोन विद्यार्थिनींच्या जबाबानंतर कारवाई
जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन विद्यार्थिनींचे जबाब घेतले. या दोन्ही विद्यार्थिनी प्रात्यक्षिक पुस्तिकेवर स्वाक्षरी घेण्यासाठी गजभिये व रामटेके या शिक्षकांकडे गेल्यानंतर त्यांना एकट्यात बोलावण्यात येत होते. त्यानंतर त्यांच्याशी अश्लील कृत्य केल्यानंतरच स्वाक्षरी देण्यात येत होती. हा प्रकार इतरही विद्यार्थिनींसोबत करण्यात आल्याचे या दोन विद्यार्थिनींच्या जबाबात समोर आले आहे.