महाबीज घोटाळय़ातील आरोपी कारागृहात
By Admin | Updated: March 28, 2016 01:37 IST2016-03-28T01:37:19+5:302016-03-28T01:37:19+5:30
शेतक-यांना भरपाईपोटी देण्यात आलेल्या रकमेत हेराफेरी केल्याचा आरोप.

महाबीज घोटाळय़ातील आरोपी कारागृहात
अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कंपनीकडून शेतकर्यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्यानंतर, त्यांना नुकसानभरपाईपोटी देण्यात आलेल्या ७0 लाख रुपयांच्या रकमेमध्ये हेराफेरी करणाच्या प्रकरणामध्ये सहभाग असलेला आरोपी प्रभाकर तराळे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश रविवारी दिले आहेत. महाबीजकडून गतवर्षी राज्यातील हजारो शेतकर्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले होते. यामध्ये राज्यातील २८६ शेतकर्यांनी महाबीजकडून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे केवळ ५ ते १0 टक्केच उगवल्याने शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील विविध भागाच्या शेतकर्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी महाबीजकडे केल्या होत्या. यावरून महाबीजच्या अधिकार्यांसोबतच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनीही या शेतीची पाहणी करून उगवणक्षमता योग्य असताना ८0 ते ९0 टक्के बियाणे न उगवल्याचा अहवाल दिला होता. या अहवालानंतर महाबीजने राज्यातील २८६ शेतकर्यांना ७0 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली. यामधील ६३ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली असून, यामध्ये मोठा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्षेत्र अधिकारी दिलीप नानासाहेब देशमुख याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. देशमुखच्या सांगण्यावरूनच महाबीज कर्मचारी पतसंस्थेचा लिपिक प्रभाकर तराळे यानेही रेकॉर्डमध्ये घोळ केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.