कुटुंबासह आरोपी फरार!
By Admin | Updated: December 25, 2015 02:58 IST2015-12-25T02:58:51+5:302015-12-25T02:58:51+5:30
ट्रकचालक हत्या प्रकरण; पोलिसांचा शोध सुरूच.

कुटुंबासह आरोपी फरार!
अकोला: ट्रकचालक विनोदकुमार त्रिभुवनसिंह याची निर्घृण हत्या करणारा आरोपी पवन तिवारी हा त्याच्या उत्तर प्रदेशातील वणी गावात मिळून आला नाही. पोलिसांनी गावामध्ये त्याचा शोध घेतला असता, त्याचे कुटुंबसुद्धा गावातून पळून गेल्याचे पोलिसांना कळले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाइन पोलीस पवनचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्हय़ातील राजरूपपूर येथे राहणारा ट्रकचालक विनोदकुमार त्रिभुवनसिंह (५0) व त्याचा क्लीनर पवन कृपाशंकर तिवारी (रा. वणी जि. कोशांबी) हे ८ डिसेंबर रोजी डाळ घेण्यासाठी अकोल्यात आले होते. त्यांनी दालमिलसमोर ट्रक उभा केला. यादरम्यान त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादादरम्यान पवन तिवारी याने विनोदकुमारच्या डोक्यावर टॉमीने वार करून त्याला जखमी केले होते. जखमी अवस्थेतच विनोदकुमार एमआयडीसी परिसरात भटकत होता. बुधवारी पोलिसांनी त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पवन तिवारी हा फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी सिव्हिल लाइन पोलिसांचे एक पथक अलाहाबाद येथे रवाना झाले. गुरुवारी पोलिसांनी अलाहाबादजवळील कोशांबी जिल्हय़ातील वणी गावात जाऊन त्याचा शोध घेतला. परंतु तो गावामध्ये मिळून आला नाही. त्याचे कुटुंबीयसुद्धा गावातून पळून गेल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांना माघारी फिरावे लागले.