अकोल्यातील डॉक्टरांच्या वाहनाला अपघात
By Admin | Updated: May 19, 2017 01:20 IST2017-05-19T01:20:12+5:302017-05-19T01:20:12+5:30
कोईम्बुतूर घाटातील घटना : १६ जण जखमी

अकोल्यातील डॉक्टरांच्या वाहनाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील डॉक्टरांचे वाहन पलटी झाल्यानंतर वाहन झाडावर आदळल्याची घटना कोईम्बुतूरजवळील घाटामध्ये गुरुवारी घडली. सुदैवाने मोठा अपघात टळला. अपघातामध्ये वाहनामध्ये सोळा जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर कोईम्बुतूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील डॉ. प्रशांत अग्रवाल, ममता अग्रवाल, डॉ. राम हेडा, डॉ. सत्येन मंत्री हे त्यांच्या कुटुंबीयासह उन्हाळ्याच्या सुट्या घालविण्यासाठी दक्षिण भारतातील उटी येथे जात होते; परंतु कोईम्बुतूरपासून काही अंतरावर असलेल्या घाटामध्ये त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, वाहन पलटी झाले आणि घाटातील एका झाडावर जोरदार आदळले. घाटातील रस्त्याच्या काठावर झाडावर वाहन आदळल्यामुळे मोठा अपघात टळला, अन्यथा वाहन दरीत कोसळले असते. सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. वाहन मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाले असून, वाहनातील डॉक्टर व त्यांच्या कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांवर कोईम्बुतूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अकोल्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शहरातील डॉक्टरांमध्ये या अपघाताची चर्चा सुरू झाली. अपघाताची अधिक माहिती मिळू शकली नाही; परंतु काही डॉक्टरांचा संपर्क झाल्यावर त्यांना डॉ. अग्रवाल, डॉ. हेडा, डॉ. मंत्री हे आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप असल्याची माहिती मिळाली.