अकोला जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांच्या लिलावास मंजुरी
By Admin | Updated: December 9, 2014 00:39 IST2014-12-09T00:39:05+5:302014-12-09T00:39:05+5:30
आयुक्तांकडून मंजुरी: बुधवारपासून सुरू होणार प्रक्रिया

अकोला जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांच्या लिलावास मंजुरी
अकोला: जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांचा लिलाव करण्यास विभागीय आयुक्तांकडून सोमवारी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया बुधवार, १0 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील लिलाव करण्यात आलेल्या रेतीघाटांची मुदत गत ३0 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. यावर्षी रेतीघाटांचा लिलाव करण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावित १८८ रेतीघाटांपैकी जिल्ह्यातील १८0 रेतीघाटांच्या लिलावास आणि लिलावाच्या निर्धारित किमतीस अमरावती विभागीय आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया १0 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
*पर्यावरण विभागाची परवानगी बाकी!
जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाकरिता १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडून राज्य पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे; मात्र पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळणे अद्याप बाकी आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या मंजुरीनुसार पर्यावरण विभागाच्या मान्यतेला अधीन राहून, जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.