आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 19:38 IST2021-07-07T19:38:20+5:302021-07-07T19:38:55+5:30
Corona Vaccination : उगवा आणि घुसर येथील उपकेंद्रांमधील कोरोना लसीकरण सत्राला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या.

आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवा
अकोला: आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवावी अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी केली आहे. सौरभ कटियार यांनी बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांच्यासह उगवा आणि घुसर येथील उपकेंद्रांमधील कोरोना लसीकरण सत्राला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या.
आगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उगवा उपकेंद्रामधील आरोग्य चमूने सकाळी सात वाजताच लसीकरण सत्र सुरू करून ११० लाभार्थ्यांना लस दिली. या सत्राचे एकंदरीत नियोजन पाहून सौरभ कटियार यांनी आरोग्य चमू तसेच ग्राम पंचायतचे कौतुक केले. यापुढेही असाच समन्वय ठेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घुसर उपकेंद्र येथेही कटियार आणि डॉ. आसोले यांनी भेट दिली. यावेळी उपकेंद्रामध्ये जागा अपुरी पडत असल्याने लसीकरण सत्र उपकेंद्रात न ठेवता गावातील शाळेमध्ये ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. लसीकरण मोहीम दीर्घकाळ चालू राहणार असल्याने आणि आरोग्य यंत्रणा सातत्याने काम करीत आहे, हे पाहता लसीकरण सत्राला मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे पाहून गावनिहाय शिक्षकांना लसीकरण सत्राची जबाबदारी देण्याची संकल्पनाही कटियार यांनी यावेळी मांडली. ग्राम पंचायत, महसूल, शिक्षण तसेच इतर विभागाचे सहकार्य असेल तर लसीकरणाची गती वाढविली जाऊ शकते आणि जिल्हा लसीकरणात अव्वल राहू शकतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन गावंडे, सीएचओ डॉ. खान, डॉ. पाटील, डॉ. हागे उपस्थित होते तसेच उगवा आणि घुसर येथील सरपंच उपस्थित होते, असे जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी प्रकाश गवळी यांनी कळविले आहे.