अवघ्या २४ तासांत अपहृत चिमुकली विसावली आईच्या कुशीत
By आशीष गावंडे | Updated: January 6, 2024 20:27 IST2024-01-06T20:27:21+5:302024-01-06T20:27:58+5:30
रामदासपेठ पोलिसांची कामगिरी; बापू नगरमधील एका घरातून घेतले ताब्यात.

अवघ्या २४ तासांत अपहृत चिमुकली विसावली आईच्या कुशीत
अकोला: रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा छडा लावण्यात रामदासपेठ पोलिसांना यश आले आहे. अवघ्या चोवीस तासात अपहृत चिमुकली मुलगी तिच्या आईच्या कुशीत विसावली. अकोटफैलस्थित बापू नगरमधील एका महिलेच्या घरातून मुलीला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हा न्यायालयासमाोरच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपडीत मुक्कामी असलेल्या रवी मलाकार रा.चंद्रपूर यांची पाच वर्षाची गुड्डी नामक चिमुकली अंगणात खेळत हाेती. खेळत असताना ती टिळक पार्क परिसरातील महादेव मंदिराजवळ गेली. ही संधी शोधत आरोपी महिलेने तिला पळवून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली हाेती. घराजवळ मुलगी दिसत नसल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी रवी मलाकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, महिला पोलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी सलमा परवीन अकबरशाह उर्फ अंजली रामदास तायडे ( ४०)रा.अकोटफैल या महिलेला अटक करण्यात आली आहे.
‘एसपीं’नी निर्देश देताच यंत्रणा लागली कामाला
दिवसाढवळ्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची बाब जिल्हा पाेलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गांभीर्याने घेत त्यांनी रामदासपेठ पाेलिस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मनाेज बहुरे यांना दिशानिर्देश दिले. ठाणेदार बहुरे यांनी वेगवेगळ्या पथकांचे गठन करीत तपासाची सुत्रे वेगाने फरविली. अखेर ६ जानेवारी राेजी मानेक टाॅकीज परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तीने चिमुकल्या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली.
लाल रंगाच्या साडीवरुन लावला छडा
पोलिसांनी टिळक पार्क परिसरात विचारपुस केल्यानंतर लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेने अपहृत चिमुकलीला चॉकलेट दिल्याचा सुगावा लागला. पाेलिसांनी परिसरातील सीसी कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, लाल रंगाची साडी घातलेली महिला आढळून आली. अधिक तपास केला असता, डोळ्यांमध्ये सुरमा, एका पायात काळा धागा व गळ्यात कवडीच्या माळ्या घातलेली महिला धार्मिक स्थळांच्या परिसरात भीक मागणारी असल्याचे निष्पन्न झाले.
म्हणे, नातेवाइकाची मुलगी आहे!
आरोपी महिलेने ५ जानेवारी राेजी मुलीचे अपहरण केल्यानंतर तीला अकोटफैलस्थित बापू नगरमधील घरात डांबून ठेवले. त्यापूर्वी शेजाऱ्यांनी विचारले असता, ही नातेवाइकाची मुलगी असल्याचे सांगितले. या मुलीचा वापर भिक मागण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.