विहिंपने जाळला आमीर खानचा प्रतीकात्मक पुतळा
By Admin | Updated: January 1, 2015 01:40 IST2015-01-01T01:40:41+5:302015-01-01T01:40:41+5:30
पीके चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी.

विहिंपने जाळला आमीर खानचा प्रतीकात्मक पुतळा
अकोला: पीके चित्रपटामध्ये हिंदू देवता व साधू-संतांचा अपमान होईल, असे चित्रीकरण व संवाद साधून धार्मिक भावना दुखावल्याने बुधवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वसंत चित्रपटगृहासमोर निदर्शने केली आणि पीके चित्रपटातील अभिनेता आमीर खान याच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर सायंकाळी आमीर खानच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. विहिंपने दिलेल्या निवेदनामध्ये पीके हा चित्रपट वादग्रस्त असून, या चित्रपटावर शासनाने बंदी घालून अभिनेता व दिग्दर्शकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या चित्रपटामध्ये हिंदू देवता व साधूंवर विडंबनात्मक संवाद सादर केले आहेत.
हिंदू संस्कृतीवर आक्षेपार्ह चित्रीकरण व संवाद साधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी आणण्याची मागणी विहिंपने केली.
बुधवारी सायंकाळी वसंत चित्रपटगृहासमोर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार नारेबाजी केली आणि आमीर खानच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. यावेळी कोतवाली पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांच्या दबावाला बळी न पडता, कार्यकर्त्यांनी पुतळय़ाचे दहन केले.