रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला भरधाव दुचाकीची धडक; महिला गंभीर जखमी
By आशीष गावंडे | Updated: February 8, 2024 19:33 IST2024-02-08T19:33:23+5:302024-02-08T19:33:49+5:30
अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला भरधाव दुचाकीची धडक; महिला गंभीर जखमी
अकोला: रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली. या धडकेत सदर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना राऊतवाडी परिसरातील रिध्दी सिध्दी कलेक्शन समोर बुधवारी घडली. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हील लाइन पोलिसांनी अज्ञात दुचाकी वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अर्चना दिनेश पांडे (४१) रा. रणपिसे नगर, राऊतवाडी ह्या त्यांच्या मुलीला शाळेत सोडून घरी परत जात हाेत्या. त्यावेळी मुख्य रोडवर रिद्धी सिद्धी कलेक्शन समोर अज्ञात दुचाकीस्वाराने अतिशय वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून पांडे यांना धडक दिली. या धडकेमुळे फिर्यादी महिला बेशुध्द झाल्या होत्या. काही काळ त्यांना काहीच समजले नाही. ही बाब त्यांच्या शेजारी राहणाऱ्या निशा रामेश्वर चव्हाण यांच्या ध्यानात येताच त्यांनी तातडीने फिर्यादी पांडे यांना तापडिया नगर चौकातील एका खासगी हाॅस्पीटलमध्ये भरती केले. या अपघातात अर्चना पांडे यांच्या चेहऱ्याला व डोक्याला डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.