रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल
By नितिन गव्हाळे | Updated: June 16, 2023 17:44 IST2023-06-16T17:40:19+5:302023-06-16T17:44:41+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रानुसार अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येत आहे.

रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल
अकोला : शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच पेन्शन घेत असलेले कर्मचारी ज्यांचे वार्षिक शासनाने सदर योजनेकरिता ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेवर आहेत. परंतु काही व्यक्तींनी पात्र नसतानाही लाभ सोडण्याबाबतचे अर्ज जमा न करता शासनाची दिशाभूल करून रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी १४ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रानुसार अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येत आहे. जे लाभार्थी शासकीय व निमशासकीय नोकरीत आहेत किंवा पेन्शन घेत असतानाही ते लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थींनी स्वतःहून २५ फेब्रुवारीपर्यंत फाॅर्म भरुन कार्यालयात सादर करणे आवश्यक होते. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करुन अन्नधान्याचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शासकीय कर्मचारी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक करुन शासकीय योजनेचा गैरप्रकारे लाभ घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासणीत आढळून आले गैरप्रकार
शासनाच्या असे निदर्शनास आलेले आहे की, स्वतः हून अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थींचा ग्रामपातळीवरील दक्षता समितीचे शासकीय सदस्य तलाठी, पोलिस पाटील यांच्यामार्फत शोध घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्या आदेशानुसार बार्शीटाकळी तालुक्यामधील ग्राम दक्षता समितीकडून कार्यालयास प्राप्त झालेले अहवालामध्ये शासकीय योजनेचा गैरप्रकारे लाभ घेणारे लाभार्थी आढळून आले.
या २५ जणांविरुद्ध फसवणूक केल्याचा आरोप
बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली येथील सुरेश जगन्नाथ गिते, शालिनी चक्रनारायण, अंबरसिंग डाबेराव, ज्ञानदेव इंद्रसिंग राठोड, खेर्डा येथील गजानन महादेव तायडे, दीपक गोपाळ वानखडे, रामदास केवळी करवते रा. टिटवा, पंचफुला विजय पोहुरकर रा. मिर्झापूर, गोदावरी विजय खंडारे रा. सारकिन्ही, बाळू जगदेव आंबेकर रा. सारकिन्ही, रेडवा येथील जनाताई उत्तम राठोड, ज्योती रवींद्र राठोड, सुनीता संतोष पवार, करूणा फुलसिंग पवार, राजंदा येथील त्रिगुणा भिमदास अरखराव, निर्मला विठ्ठल जांभुळकर, सिंदखेड येथील राजकुमार हनुमंते, महादेव तायडे, विजय पारसकर, बाळू अंबादास वानखडे, महान येथील गजानन पुंडलिक वाघमारे, हाफिजा बी अब्दुल बशीर, धाबा येथील विलास बासू राठोड, भीमराव गणू राठोड, देवानंद जानकीराव हिवराळे आदींनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.