अकोला जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणुकीत ९५ टक्के मतदान
By Admin | Updated: May 6, 2015 00:33 IST2015-05-06T00:33:57+5:302015-05-06T00:33:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोरपे यांचे वर्चस्व

अकोला जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणुकीत ९५ टक्के मतदान
अकोला : अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या १0 जागांसाठी मंगळवार, ५ मे रोजी झालेल्या निवडणुकीत ९५ टक्के मतदान झाले. अकोला व वाशिम जिल्ह्यात विस्तार असलेल्या या बँकेचे २१ संचालक निवडायचे होते. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोष कोरपे यांच्या सहकार पॅनलचे ११ संचालक यापूर्वीच अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीची औपचारिकता उरली असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा सहकारी बँकेवर डॉ. संतोष कोरपे यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीची प्रक्रिया ८ एप्रिल रोजी सुरू झाली होती. २४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून विरोधक नसल्याने अकोला मतदारसंघातून डॉ. संतोष कोरपे, बाळापूर मतदारसंघातून राजेश राऊत, पातूरमधून जगदीश पाचपोर, मूर्तिजापूरमधून सुहास तिडके, रिसोड मतदारसंघातून आमदार अमित झनक, वैयक्तिक मतदारसंघातून वामनराव देशमुख, इतर मागासवर्ग मतदारसंघातून डॉ. सुभाषचंद्र कोरपे, मंगरुळपीरमधून सुभाष ठाकरे, अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातून अंबादास तेलगोटे, विमुक्त-भटक्या जाती प्रवर्गातून रामसिंह जाधव, तर कृषिउत्पन्न बाजार समिती मतदारसंघातून शिरीष धोत्रे अविरोध निवडून आले आहेत. अकोला व वाशिम जिल्ह्यातील पगारदार संस्था, प्राथमिक सहकारी पतपुरवठा व महिला मतदारसंघातील उर्वरित दहा जागांसाठी ५ मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात ९४.४२ व वाशिम जिल्ह्यात ९६.१८ टक्के मतदान झाले. दोन्ही जिल्हे मिळून ९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आयएमए हॉलमध्ये ७ मे रोजी मतमोजणी होणार असून, या निवडणुकीत डॉ. कोरपे गटाचे रमेश हिंगणकर, हिदायत पटेल, प्रकाश लहाने रिंगणात आहेत.