जिल्हय़ातील ९ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश!
By Admin | Updated: June 6, 2016 02:46 IST2016-06-06T02:46:40+5:302016-06-06T02:46:40+5:30
प्रवेश देण्यासाठी १७२ शाळा पात्र; नर्सरी व पहिलीमध्ये मिळणार प्रवेश.

जिल्हय़ातील ९ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश!
नितीन गव्हाळे /अकोला
शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २५ टक्के प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश देणे बंधनकारक आहे. जिल्हय़ात प्रवेश देण्यासाठी १७२ इंग्रजी माध्यमाच्या शाळा पात्र ठरल्या असून, या शाळांमधील नर्सरी व इयत्ता पहिलीमध्ये ९ हजार ८६६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. २५ टक्के प्रवेश प्रकियेसाठी पाल्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत ३१ मे रोजी संपली असून, हे अर्ज पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
शासनाने आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग आणि ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे, अशांच्या पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हय़ातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. गतवर्षीसुद्धा जिल्हय़ात २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यंदा प्रथम ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली होती. जवळपास १४ हजारावर पालकांनी त्यांच्या पाल्यांना नर्सरी व इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज केले होते. त्यामध्ये अनेक पालकांना ऑनलाइन अर्जामध्ये नर्सरी हा पर्याय नसल्याने निराश व्हावे लागले आणि डोनेशन भरून शाळेमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करावी लागली.