नाफेडच्या केंद्रावरील ९८० कट्टे सील

By Admin | Updated: May 27, 2017 00:57 IST2017-05-27T00:57:36+5:302017-05-27T00:57:36+5:30

तेल्हारा : टोकनची नोंद नसल्याने जिल्हा उपनिबंधकांची कारवाई

9 80 sticky seals from Nafed center | नाफेडच्या केंद्रावरील ९८० कट्टे सील

नाफेडच्या केंद्रावरील ९८० कट्टे सील

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा उपनिबंधक मावळे यांनी २६ मे रोजी तेल्हारा येथील नाफेडच्या केंद्राची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांनी टोकनची नोंद नसलेली ९८० कट्टे आढळली. त्यामुळे ही सर्व कट्टे सील करण्यात आली आहे.
तेल्हारा येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्रावर अनेक गैरप्रकार झाले आहेत. बोगस टोकन देऊन व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर मोजण्यात आला होता. पुरवणी टोकनच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस टोकनचे वाटप बाजार समितीने केले. बाजार समितीच्या रेकॉर्डमध्ये अनेक ठिकाणी खोडाखोड करण्यात आली आहे, तसेच रेकॉर्डवर ८२ नग असताना १८२ करणे व पुरवणी टोकन देऊन मोजमाप केल्याचा प्रकारही या केंद्रावर घडला होता. तुदगाव येथील शेतकऱ्याच्या नावावर २२४ नगाची नोंद आहे; मात्र ते कोणत्या वाहनाने आणले, याचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. मनब्दा येथील शेतकरी संतोष जानराव पाथ्रीकर यांनी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी १७२ नग तूर आणली होती. त्यांच्या १०८२ याच टोकनवरून १० शेतकऱ्यांना पुरवणी टोकन देण्याचा प्रताव बाजार समितीने केला आहे. विशेष म्हणजे, पुरवणी टोकन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांनाच देता येते; परंतु पाथ्रीकर यांच्या नात्यात नसलेल्याही अनेकांना बाजार समितीने पुरवणी टोकनचे वाटप करून त्यांची तूर मोजली आहे. बाजार समितीतील या सर्व गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांनी २६ मे रोजी चौकशी केली. या चौकशीदरम्यान टोकनची नोंद नसलेले ९८० कट्टे तूर आढळली. ही तूर सील करण्यात आली आहे. उपनिबंधकांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनीही अकोला जिल्हाधिकाऱ्यांना तेल्हारा नाफेड केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

तेल्हारा येथील नाफेडच्या केंद्रावर शुक्रवारी चौकशी केली. यावेळी टोकनची नोंद नसलेले ९८० कट्टे तूर आढळल्याने सील करण्यात आले आहेत. सात-बारा व इतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांची तूर परत करण्यात येईल.
- जी.जी. मावळे,
उपजिल्हा निबंधक, अकोला.

Web Title: 9 80 sticky seals from Nafed center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.