८४ खेडी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:06 IST2017-05-19T01:06:09+5:302017-05-19T01:06:09+5:30
चोहोट्टा बाजार(जि. अकोला) : कामाचा मोबदला न मिळाल्याने अकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंदचे अस्त्र उपसले आहे.

८४ खेडी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार(जि. अकोला) : गत दोन महिन्यांपासून कामाचा मोबदला न मिळाल्याने अकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंदचे अस्त्र उपसले आहे. यासंदर्भात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मजीप्राचे विभागीय अभियंता अकोला यांना निवेदन सादर केले आहे.
मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या आधी ६ मे पासून काम बंद केले होते; मात्र मजीप्राचे उपविभागीय अभियंता ताठे यांनी मध्यस्थी करून कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू झाले; मात्र अद्याप त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २० मे रोजी सकाळपासूनच काम बंद करण्याचा इशारा निवेदनातून दिला. तसेच दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता अल्पशा पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते. त्यामुळे पगारात वाढ करण्याचीही मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.