८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न अनुत्तरित!
By Admin | Updated: October 28, 2014 00:26 IST2014-10-28T00:26:59+5:302014-10-28T00:26:59+5:30
बैठकीत चर्चा अपूर्ण, अधिका-यांची अनुपस्थिती; अकोला जिल्हा परिषदेत आज पुन्हा चर्चा.

८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न अनुत्तरित!
अकोला : ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेल्या बैठकीतील चर्चा जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रमुख अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे अर्धवटच राहिली. त्यामुळे या योजनेचा प्रश्न निकाली निघू शकला नाही. आता मंगळवारी पुन्हा याबाबत चर्चा केली जाईल.
खारपाणपट्टय़ातील अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालविण्यात येत आहे. २0 मे रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी किंवा देखभाल-दुरुस्ती खर्चापोटी दरमहा १५ लाख २५ हजार रुपये मजीप्राला द्यावे,अन्यथा १ नोव्हेंबरपासून योजनेचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. ही नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलव्यवस्थापन विभागाच्या यवतमाळ येथील कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाली . त्यानुषंगाने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी दुपारी १ वाजता मजीप्रा व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती.