सुपर स्पेशालिटीमध्ये कोविडग्रस्त चिमुकल्यांसाठी ८० खाटा राखीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 19:51 IST2021-05-13T19:48:38+5:302021-05-13T19:51:03+5:30
Akola super specialty hospital News : सुपर स्पेशालिटीच्या इमारतीमध्ये प्रस्तावित कोविड रुग्णालयात ८० खाटा राखिव ठेवण्यात आल्या आहेत.

सुपर स्पेशालिटीमध्ये कोविडग्रस्त चिमुकल्यांसाठी ८० खाटा राखीव!
अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून यामध्ये बालकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या बालरुग्णांवर स्वतंत्र उपचार व्हावे, या अनुषंगाने सुपर स्पेशालिटीच्या इमारतीमध्ये प्रस्तावित कोविड रुग्णालयात ८० खाटा राखिव ठेवण्यात आल्या आहेत. यातील २० खाटा आयसीयु, तर ऑक्सिजनच्या ६० खाटा राहणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये यांनी पालकमंत्र्यांना आढावा बैठकीदरम्यान दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालायत पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या प्रसंगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात प्रस्तावित २५० खाटांच्या कोविड रुग्णालयाच्या कामकाजाचाही आढावा त्यांनी घेतला. दरम्यान विदर्भात लहानमुलांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्या दृष्टिकोनातून सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सुचना पालकमंत्री कडू यांनी अधिष्ठाता यांना दिल्या. त्यानुसार, २५० खाटांपैक्षी ८० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड हा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिली. यामध्ये २० खाटा व्हेंटिलेटर, तर ऑक्सिजनसाठी ६० खाटा राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे कोविड रुग्णालय सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात बालरुग्ण विभाग सुरू करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
बालरुग्णांसोबत मातांची राहण्याची व्यवस्था
सुपर स्पेशालिटीच्या इमारतीमध्ये प्रस्तावित कोविड रुग्णालयात कोरोनाग्रस्त बालरुग्णांसोबत त्यांच्या मातांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इमारतीचा संंपूर्ण एक मजला बाल रुग्णांसाठी राखीव असणार आहे.
१० केएलची ऑक्सिजन टँक
सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरात कोविड रुग्णांसाठी १० केएलची लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून येथील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.
दृष्टिक्षेपात खाटांचे विभाजन
एकूण खाटा - २५०
व्हेंटिलेटर खाटा - ५० (२० बालरुग्ण, ३० इतर कोविड रुग्ण)
ऑक्सिजन खाटा - २०० (६० बालरुग्ण, १४० इतर कोविड रुग्ण)